नाशिक: समृध्दी महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच असून रविवारी मध्यरात्री शिर्डी ते भरवीर या टप्प्यात सिन्नर तालुक्यात कारला झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू तर, चार जण जखमी झाले. समृध्दी महामार्गाचा शिर्डी ते भरवीर हा सुमारे ८० किलोमीटरचा दुसरा टप्पा १५ दिवसांपूर्वी वाहतुकीसाठी खुला झाला. रविवारी मध्यरात्री महामार्ग पोलीस केंद्राच्या हद्दीतील खापराळे शिवारात घोटीकडून शिर्डीकडे जाणारी कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या संरक्षक भिंतीवर आदळली. कारमधील प्रवासी नातेवाईकांना हज यात्रेसाठी मुंबई येथे सोडून शिर्डीकडे परत येत होते. अपघातात वाहनाचा चक्काचूर झाला. रज्जाक अहमद शेख (५५), सत्तार शेख लाल शेख (६५), सुलतान सत्तार शेख (५०) यांचा जागीच मृत्यू झाला. फय्याज शेख यांचा उपचार सुरू असतांना मृत्यू झाला. जुबेर रज्जाक शेख (३५), मेरून्निसा शेख (४५), अझर शेख (२५), मुस्कान शेख (२२) हे गंभीर जखमी आहेत. सिन्नर येथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना शिर्डी येथे हलविण्यात आले. मागील आठवड्यात महामार्गावरील या टप्प्यात तीन जणांचा मृत्यू झाला होता. महामार्ग धोक्याचा का ठरतो ?
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गावर होणाऱ्या अपघातांची वेगवेगळी कारणे सांगितली जातात. वास्तविक महामार्गावर धावणाऱ्या वाहनांसाठी वेगमर्यादा ठरवून देण्यात आली आहे. मात्र बऱ्याचदा वाहनचालक रस्ता मोकळा मिळाल्याने वेग वाढवतात, काही वेळा टायर फुटते, वाहनावरील नियंत्रण सुटते, अशी वेगवेगळी कारणे आहेत. वाहनचालकांनी वेगविषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन महामार्ग प्राधिकरणच्या वतीने करण्यात आले आहे.