ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना कर्जाची सुविधा गावातच, छत्तीसगडसारखी योजना महाराष्ट्रातही शक्य: राज्यपाल


छत्तीसगड राज्यामध्ये कर्ज सुविधा गावातच उपलब्ध केली आहे. साेसायटीमधून शून्य टक्के व्याजाने कर्ज दिले जाते. शेतकऱ्यांना उत्पादित केलेले धान बाजारात जाऊन विकावे लागत नाही. गावातील साेसायटी ते विकत घेऊन आपले कर्ज फेड करून घेते, त्यामुळे वसुलीचाही प्रश्न उरत नाही. या याेजनेची सर्व कागदपत्रे महाराष्ट्र सरकारला देणार आहे. सरकारने ती कागदपत्रे तपासून अशी याेजना महाराष्ट्रात लागू करता आली तर ते माेठ्या पुण्याचे काम हाेईल, असा आशावाद राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केला.

स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा यांचे जन्मशताब्दी वर्ष व लोकमत अकोला आवृत्तीच्या रौप्य महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त शनिवार अकोला येथे झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल म्हणाले, मी जगभरात फिरत असताना कुठल्याही बाजारपेठेत मेड इन चायना वस्तू दृष्टीस पडल्या. पूर्वी मेड इन जपान दिसायचे. परंतु, मला विश्वास आहे की, एकविसावे शतक हे भारताचे असेल आणि सर्वत्र मेड इन भारत दिसेल.

प्रारंभी राज्यपाल बैस यांचा ‘लाेकमत’च्या वतीने श्रद्धेय बाबूजींवर भारत सरकारने काढलेले टपाल तिकीट, सुवर्णमुद्रा ग्रंथ, ‘बाबूजी’ कॉफी टेबल बुक, तसेच स्मृतिचिन्ह देऊन डाॅ. विजय दर्डा व राजेंद्र दर्डा यांनी सत्कार केला. लाेकमत अकाेला आवृत्तीचे कार्यकारी संपादक किरण अग्रवाल यांनी आभार मानले, संचालन उपवृत्त संपादक राजेश शेगाेकार यांनी केले.

…तर तरुण विदेशामध्ये जातील

भारत युवकांचा देश आहे. छोटे-छाेटे काम करणाऱ्या तरुणांसाठी छत्तीसगडमध्ये राबविल्या गेलेल्या कौशल्य विकास कार्यक्रमाप्रमाणेच महाराष्ट्रात कुशल कारागिरांना प्रशिक्षण देऊन प्रमाणपत्र दिले, त्यांची नाेंदणी केली तर आमचे तरुण विदेशामध्ये जातील, असेही राज्यपाल म्हणाले.

राज्यपालांनी महाराष्ट्र गीताला प्रतिष्ठा दिली : डाॅ. विजय दर्डा

राजशिष्टाचारानुसार राज्यपालांच्या कार्यक्रमात राष्ट्रगीत गायले जातेच; पण राज्यपाल बैस यांनी महाराष्ट्र गीतालाही तेवढाच सन्मान, प्रतिष्ठा दिल्याने ही बाब मनाला भावली असल्याचे डाॅ. विजय दर्डा यावेळी म्हणाले. देशाचे पहिले कृषी मंत्री डाॅ. पंजाबराव देशमुख यांच्या नावाने येथे कृषी विद्यापीठ आहे; मात्र याच परिसरात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण अधिक असल्याबद्दल खंत व्यक्त करीत शेतकऱ्यांना बळ मिळाले पाहिजे, यासाठी लाेकमत सातत्याने काम करत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. वऱ्हाडची वेगळी संस्कृती आहे, ती संस्कृती लाेकमतच्या पानावर नेहमीच उमटते, असे स्पष्ट करत प्रेम हाच वऱ्हाडचा आत्मा आहे, ताे कायम ठेवण्याचाही प्रयत्न झाला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

वऱ्हाडात मेडिकल कॉलेज, स्वतंत्र विद्यापीठ हवे- राजेंद्र दर्डा

अकाेला, वाशिम व बुलढाण्यासाठी स्वतंत्र विद्यापीठाची आवश्यकता आहे. हे विद्यापीठ जाेपर्यंत हाेत नाही ताेपर्यंत विद्यापीठाचे उपकेंद्र तरी येथे सुरू व्हावे, अशी मागणी लाेकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी यावेळी अध्यक्षपदावरून केली. अकाेला येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे म्हणून लाेकमतने सातत्याने पाठपुरावा केला; मात्र आराेग्य सेवेची गरज लक्षात घेता वाशिम, बुलढाण्यातही वैद्यकीय महाविद्यालये स्थापन व्हावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पश्चिम वऱ्हाडातील वाचकांच्या आकांक्षांना बळ देण्याचे काम लाेकमत यापुढेही करत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

विविध क्षेत्रातील दिग्गजांचा सन्मान

या शानदार सोहळ्यात सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज, आचार्य हरिभाऊ वेरूळकर गुरुजी, साहित्यिक पद्मश्री नामदेव कांबळे, बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक, माजी मंत्री अजहर हुसेन, डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, उद्योजक सिद्धार्थ रुहाटिया, आंतरराष्ट्रीय मुष्टियोद्धा साक्षी गायधनी यांचा सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *