औरंगजेब आणि बाबर हे दोघेही घुसखोर होते. मात्र, महात्मा गांधी यांची हत्या केली असली तरीही नथुराम गोडसे हे भारताचे सुपुत्र होते, असे वादग्रस्त विधान केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी केले आहे. छत्तीसगड दौर्यावर असलेल्या गिरीराज सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, नथुराम गोडसेंनी महात्मा गांधींची हत्या केली असली, तरीही ते भारताचे सुपुत्र होते. कारण, नथुराम गोडसेंचा जन्म भारतात झाला. ते भारतात जन्माला आले. औरंगजेब किंवा बाबर यांच्याप्रमाणे घुसखोर नव्हते. ज्याला बाबरची अवलाद आहोत हे म्हणण्यात धन्यता वाटते, तो भारतमातेचा सुपुत्र असू शकत नाही.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर दंगलप्रकरणी बोलताना महाराष्ट्रात अचानक औरंगजेबाच्या औलादी जन्माला आल्या आहेत, असे विधान केले होते. त्यावर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी तु्म्हाला नथुराम गोडसे आणि आपटेच्या औलादी कोण आहेत हेही माहिती असेल, असे प्रत्युत्तर दिले होते. त्याबाबत प्रश्न विचारला असता गिरीराज सिंह यांनी वरील विधान केल्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे.