अमरनाथ यात्रेबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी (ता. ९) महत्त्वाची माहिती दिली. सर्व यात्रेकरूंना आरएफआयडी कार्ड दिले जातील जेणेकरून त्यांचे रिअल टाइम लोकेशन ट्रेस केले जाईल आणि सर्वांना ५ लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाईल, अशी माहिती देण्यात आली. यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या प्रत्येक जनावरासाठी ५० हजार रुपयांचे विमा संरक्षण असणार आहे. दक्षिण काश्मीर हिमालयातील ३८८० मीटर उंचीवर असलेल्या अमरनाथच्या पवित्र गुहेची ६२ दिवसांची वार्षिक यात्रा १ जुलैपासून सुरू होईल आणि ३१ ऑगस्टपर्यंत चालेल. गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत त्यांनी केंद्र सरकार, लष्कर आणि जम्मू-काश्मीर प्रशासनाच्या उच्च अधिकाऱ्यांसोबत अमरनाथ यात्रेच्या तयारीचा आढावा घेतला.
अमरनाथ यात्रेकरूंचा प्रवास सुरळीत व्हावा हे नरेंद्र मोदी सरकारचे प्राधान्य आहे आणि जम्मू-काश्मीरमधील संपूर्ण यात्रेच्या मार्गावर पुरेशी सुरक्षा व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
श्रीनगर-जम्मू येथून रात्रीची विमानसेवा
गृहमंत्री अमित शाह यांनी यात्रेकरूंच्या सोयीसाठी विमानतळ आणि रेल्वे स्थानक ते तीर्थक्षेत्र आधार शिबीर या मार्गावर व्यवस्था चोख ठेवण्यावर भर दिला आणि श्रीनगर आणि जम्मू येथून रात्रीची विमानसेवा देण्याचे निर्देश दिले. जम्मू आणि काश्मीरमधील बालटाल आणि पहलगाम या दोन मार्गांनी यात्रेकरू प्रवास करतात. ऑक्सिजन सिलिंडरचा पुरेसा साठा आणि त्यांचे रिफिलिंग सुनिश्चित करण्याचे निर्देशही गृहमंत्र्यांनी दिले आणि डॉक्टरांच्या अतिरिक्त पथकांची उपलब्धता करण्यास सांगितले.
कोणत्याही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पुरेशा प्रमाणात खाटा आणि रुग्णवाहिका आणि हेलिकॉप्टर तैनात करण्याचे निर्देशदेखील देण्यात आले. यासोबतच यात्रा मार्गांवर तंबूची व्यवस्था, वाय-फाय हॉटस्पॉट आणि योग्य प्रकाश व्यवस्था करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे.गेल्या वर्षी ३,४५ लाख भाविकांनी या यात्रेच्या मध्यामातून दर्शन घेतले होते आणि यावर्षी ही संख्या पाच लाखांच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे. सूत्रांनी सांगितले, की कोणत्याही संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा धोका लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने (एनडीआरएफ) यात्रेकरूंच्या छावण्यांसाठी योग्य ठिकाणे शोधण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे पवित्र गुहेजवळ आलेल्या पुरामुळे १६ भाविकांचा मृत्यू झाला होता.