वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने काल शनिवारी दुपारी 4 वाजता अचानक हजेरी लावली. काही मिनिटांसाठी जोरदार सुटलेल्या वादळी वाऱ्यात रस्त्यावरील झाडे व झाडाच्या फांद्या उन्मळून वीजवाहक तारांवर पडल्याने महावितरण विभागाचे मोठे नुकसान झाले. आरोळे नगर येथे विजेचा खांब आडवा झाल्याने काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती.
तालुक्यात मान्सूनपूर्व अवकाळी पाऊस कोसळत आहे. अशातच अचानक शनिवारी दुपारी काही क्षणासाठी कोसळलेला जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यात चौफुला येथील लिंबाचे मोठे झाड उन्मळून पोलिसाच्या दुचाकीवर पडल्याने दुचाकीचे मोठे नुकसान झाले. वादळामुळे झाडे उन्मळून वीज वाहिन्यांवर पडली. त्यामुळे वीज वाहिन्या तुटण्यासह त्यांचे खांबदेखील वाकले होते. त्याचबरोबर आरोळेवस्ती येथील जामखेड करमाळा रस्त्याच्या बाजूला असलेल्या विजेचा खांब रस्त्यावर अडवा झाला होता. यामुळे तारा तुटुन पडल्याने वाहतूक थांबविण्यात आली होती. अनेक वर्ष जुनी झालेली वृक्ष जमिनीतून सडल्याने ती आता धोकादायक ठरू लागली आहेत.
पावसामुळे शहरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. रात्री उशिरा वीजपुरवठा सुरळीत झाला. अनेक घरांवरचे पत्रे वाऱ्याने उडाले. त्यातच वीजपुरवठा खंडित झाल्याने अंधारात नागरिकांचे हाल झाले. पुन्हा आज दुपारी पाऊस सुरू झाल्यानंतर वीजपुरवठा काही काळ खंडित झाला होता. वीजपुरवठा वारंवार खंडित होऊ नये यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित याकडे लक्ष घालून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत होती.