मुंबईकरांची मेट्रो दररोज पाच कोटी युनिट वीज खाणार; सध्या पाच मेगावॅटचा वापर, विजेची एकूण मागणीही वाढणार
मुंबई मेट्रो टप्प्याटप्प्याने मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत असून त्यांचा वीज वापरही वाढत आहे. पुढील चार-पाच वर्षांत मुंबई-ठाण्यातील मेट्रोचे जाळे पूर्ण क्षमतेने कार्यरत होणार असून त्यासाठी दररोज तब्बल पाच कोटी युनिट म्हणजे जवळपास 50 मेगावॅटहून अधिक वीज लागणार आहे. सध्या मुंबईत तीन मार्गांवर मेट्रो धावत असून त्यासाठी दररोज 50 लाख युनिट वीज लागत आहे. मेट्रोसाठी लागणाऱया वाढीव विजेमुळे मुंबईच्या विजेच्या एकूण मागणीत मोठी भर पडणार आहे.
सध्या मुंबईची विजेची मागणी विक्रमी टप्प्यावर असून त्यामध्ये भविष्यात मोठी भर पडणार असल्याचे निश्चित झाले आहे. मुंबईत सध्या घाटकोपर-वर्सोवा, अंधेरी डी. एन. नगर-दहिसर आणि दहिसर पूर्व-गुंदवली या तीन मार्गांवर मेट्रो धावत आहेत. या मार्गांवर दररोज जवळपास आठ-दहा लाख प्रवासी प्रवास करत आहेत, तर कफ परेड-बीकेसी-आरे या भुयारी मेट्रोबरोबरच अन्य दहा मेट्रो मार्गाचे काम वेगात सुरू असून पुढील चार वर्षांत टप्प्याटप्प्याने सेवेत येणार आहेत. या मार्गावरील सर्व गाडय़ांमध्ये उच्च क्षमतेची वातानुकूलित यंत्रणा बसवण्यात येत आहे. त्यामुळे त्याला मोठय़ा प्रमाणात विजेची गरज लागणार आहे. त्यामुळे मुंबईतील मेट्रोचे जाळे जेव्हा पूर्ण क्षमतेने सुरू होईल तेव्हा त्यास 50-60 मेगावॅटहून अधिक वीज लागेल, अशी माहिती टाटा पॉवरच्या वितरण आणि पारेषण विभागाचे प्रमुख संजय बांगा यांनी सांगितले.
मुंबईबाहेरून वीज आणावी लागणार
मुंबईच्या विजेच्या मागणीत सातत्याने मोठी वाढ होत असून पुढील तीन-चार वर्षांत ती पाच हजार मेगावॅटच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. आज मुंबईची अंतर्गत वीजनिर्मिती क्षमता सुमारे 1600 मेगावॅट आहे. तसेच भविष्यातही येथे नवीन वीज प्रकल्प उभारणे शक्य नाही. त्यामुळे मुंबईची विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी राज्याच्या ग्रीडमधून वीज आणण्याशिवाय पर्याय नसल्याचे वीजतज्ञ डॉ. अशोक पेंडसे यांनी सांगितले. त्यासाठी उच्च क्षमतेच्या वीजवाहिन्या उभाराव्या लागणार आहेत.