पोलिस मुख्यालयातील हजेरी मास्तरांचे प्रताप उघड करणारी मालिका यापूर्वीच ‘सकाळ’ने विस्तृत स्वरूपात मांडली. त्याची दखल घेत पोलिस अधीक्षकांनी १२६ कर्मचाऱ्यांना हुडकून काढले आहे. या सर्व कर्मचाऱ्यांची आता सकाळी व सायंकाळी हजेरी घेण्यात येणार असून, चार हजेरी मास्तरांची खातेअंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यात चौघांचे प्रताप निलंबनाच्या कारवाईपर्यंत नेणार असल्याचे सांगण्यात येते.
जिल्हा पोलिस दलातील मातब्बर पोलिसांनी नोकरी केवळ नावाला ठेवली आहे. या नोकरीच्या नावाने वेगळेच धंदे ही मंडळी करते. त्यात कुणी वाळू ठेकेदार झाला आहे, कुणी वाळू वाहतूकदार आहे, तर काहींनी बिल्डरशीप सुरू केलीय, खरेदी-विक्रीच्या धंद्यात बहुतेक मंडळी कार्यरत आहेत.
पैशांनी गब्बर झालेल्या पोलिसांकडून ड्यूट्या होत नाहीत किंवा त्यांना ज्या मलाईच्या ठिकाणी नोकरी करायची आहे, तेथे त्यांना पोस्टिंग मिळत नाही, अशा कर्मचाऱ्यांनी थेट मुख्यालयच आपला अड्डा बनविला आहे. त्यातच व्हीआयपींकडे सुरक्षा व्यवस्थेत नियुक्त कर्मचाऱ्यांना ड्यूट्यांसह सुट्यांसाठी प्रत्येकी पैशांची मागणी होत असल्याची तक्रार पोलिस अधीक्षकांकडे केली होती. त्या अनुषंगानेही हजेरी मास्तर प्रकरण प्रकाशझोतात आले.
पोलिस दलाच्या मनुष्यबळचा गैरवापर
गब्बर पोलिसांना लपण्यासाठी एटीसी, आर्थिक गुन्हे, लाइन पिकेट-पेट्रोलिंग, गरज नसताना पोलिस स्पोर्ट अंतर्गत टेनिस ग्राउंडवर सहा आणि फुटबॉल मैदानावर चार ते सहा कर्मचारी, पोलिस वसाहतीला गस्तीला सहा कर्मचारी केवळ कागदावर नेमले जातात, पाणी पिकेटसाठी आठ कर्मचारी नेमले जातात.
प्रत्यक्षात त्याठिकाणी एकच कर्मचारी असल्याचे आढळले आहे. लाइन पिकेट गरज नसताना १२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. प्रत्यक्षात त्या ठिकाणी एक अथवा दोन कर्मचारी नेमल्याचे सांगण्यात आले. जिमसाठी चार कर्मचारी नेमले आहेत. त्याठिकाणी प्रत्यक्षात एक अथवा दोन कर्मचारी आहेत. मग, हे गैरहजर कर्मचारी जातात कुठे?, गैरहजर कर्मचारी बाहेर वेगळ्याच उद्योगात लिप्त असल्याचे व महिन्याला हजेरी मास्तरांना ठराविक रक्कम देऊन छुप्या ठिकाणी कागदारवर ड्यूट्या करत असल्याचे उघडकीस आले आहे.
स्पेशल १२६ हजेरीवर
पोलिस अधीक्षकांच्या सूचनेवरून शोध घेतल्यानंतर तब्बल १२६ कामचुकार पोलिस कर्मचारी या हजेरी मास्तरांनी वेगवेगळ्या ड्यूट्यांवर लपवून ठेवले होते. या सर्व कर्मचाऱ्यांना पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी सकाळी नऊ आणि सायंकाळी सातला हजेरी लावण्याचे बजावले आहे. परिणामी, काही दिवस का असेना, या मातब्बर पोलिसांना कुठे बाहेर जाता येणार नाही.
‘त्या’ चौघांची चौकशी सुरू
मुख्यालयात एकूण सात ते आठ हजेरी मास्तर आहेत. वास्तविक हे काम नियोजनबद्ध दोनच वरिष्ठ कर्मचाऱ्यांचे आहे. असे असताना हजेरी मास्तरांचीच संख्या आठ झाली आहे. पूर्वी एक नाशिक रीटर्न वाघ साहेबांच्या तक्रारी आल्याने ते बाजूला झाले, तर कलीम दादा, धनराज बडगुजर, प्रमोद कोळी, पांडव, असे लोक कार्यरत असून, हजेरी मास्तर युवराज देवरे, विशाल पाटील आणि राठोड यांची गृह विभागाच्या ‘डीवायएसपीं’कडून चौकशी सुरू झाली आहे.