नाशिक : पोलिस हवालदार हरी जानू पालवी (५१) यांना तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच घेताना गुरुवारी (दि.१) सायंकाळच्या सुमारास अटक करण्यात आली होती. लाच प्रकरणी अटकेत असलेल्या पालवी यांना शुक्रवारी (दि. २) निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायालयात नेले असता न्यायाधीश ए. व्ही. गुजराथी यांनी एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान या कारवाईमुळे खाकी वर्दीकडून सर्वसामान्यांची होणारी पिळवणूक समोर आल्याने पोलिसांत चलबिचल बघावयास मिळाली.
५९ वर्षीय तक्रारदार यांचे त्यांच्या भावासोबत शेत-जमिनीच्या वहिवाटीवरून वाद झाल्याने चांदवड पोलिस ठाण्यात तक्रारदार व त्यांच्या भावाविरुद्ध परस्परविरोधी गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदार यांच्याकडून दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपीविरुद्ध वाढीव कलम लावून आरोपींवर कारवाई करण्याकरिता तक्रारदारांकडून २० हजार रुपयांची लाच पोलिस हवालदार हरी पालवी यांनी पंचांसमक्ष मागणी केली हाेती. त्यातील पहिला हप्ता १० हजार रुपये घेताना धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पोलिस हवालदार पालवी याला रंगेहाथ अटक केली. रात्री उशिरा झालेल्या या कारवाईमुळे पोलिस वर्तुळात भीती पसरली आहे. ही कारवाई धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मंजित सिंग चव्हाण, राजन कदम, संतोष पावरा, रामदास बारेला, मकरंद पाटील, गायत्री पाटील, प्रवीण पाटील, जगदीश बडगुजर आदींनी केली.