कोल्हापूर : वटपौर्णिमेचा सण आज राज्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना करत महिला आजच्या दिवशी वडाचे पूजन करून त्याला फेऱ्या मारत असतात.
दरम्यान, महिला वडाच्या झाडाची पूजा करून फेऱ्या मारत असताना अचानक वडाच्या झाडाला आग लागल्याची घटना कोल्हापूरातील अंबाबाई मंदिरात घडली आहे.
आग लागल्याचे समजताच मंदिरातील कर्मचाऱ्यांनी अग्निशमन यंत्राने आग आटोक्यात आणली. मात्र अचानक आग लागल्याने मंदिर परिसरात चांगलीच खळबळ उडाली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज वटपौर्णिमानिमित्त महिला अंबाबाई मंदिरात आल्या होत्या. मंदिरात वडाचे झाड आहे. महिला वडाच्या झाडाची पूजा करून त्याला फेरे मारत होत्या. यावेळी पूजा करताना महिलांनी वडाजवळच कापूर, अगरबत्ती पेटवल्या होत्या. त्याचवेळी अचानक जळत्या कापूराचा महिला वडाला गुंडाळत असलेल्या दोरीला स्पर्ष झाला. आणि काही कळायच्या आतच मोठी आग लागली.
दरम्यान, आग आटोक्यात असून यावेळी कोणताही जीवीत किंवा वित्त हानी झाली नाही. झाडाच्या एका बाजूचा भाग जळून खाक झाला आहे. यापुढे महिलांनी कापूर, अगरबत्ती झाडाच्या जवळ लावू नये असे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे.