भारतीय रिझर्व्ह बँकेने मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआयने (RBI) बाजारातून 2000 रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत या नोटा वापरता येणार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.
2018-19मध्येच 2000 रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती. आता नागरिकांना 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी 3 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. (RBI Big Decision 2000 notes will be close for finance after September 30)
आरबीआयच्या माहितीनुसार, 2000 रुपयांच्या नोटा मागे घेण्याची घोषणा केली असली तरी सध्या बाजारात असलेल्या 2 हजार रुपयांच्या नोटा व्यवहारासाठी वापरता येणार आहेत. या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत वैध राहतील. तोपर्यंत ज्यांच्याकडे 2 हजार रुपयांच्या नोटा आहेत, त्यांना बँकेते जाऊन नोटा बदलून घ्याव्या लागणार आहेत.
या 2000 रुपयांच्या नोटा बँकांमध्ये 23 मेपासून बदलण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. नागरिकांना 30 सप्टेंबरपर्यंत एकावेळी फक्त 20 हजार रुपयांपर्यंत 2000 रुपयांच्या नोटा बदलता येतील. तथापि, यासाठी बँकांना विशेष खिडकी उघडावी लागणार आहे.
नोव्हेंबर 2016मध्ये जाहीर करण्यात आलेल्या नोटाबंदीनुसार 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आरबीआयने 2000 हजार रुपयांची नोट चलनात आणली. 2016-17 या आर्थिक वर्षात 2000 रुपयांच्या 35429.91 कोटी नोटा छापल्या होत्या. यानंतर 2017-18 मध्ये अत्यंत कमी 1115.07 कोटी नोटा छापण्यात आल्या. 2019-20, 2020-21 आणि 2021-22 या तीन आर्थिक वर्षांमध्ये 2000 रुपयांची एकही नोट छापलेली नाही.
दरम्यान, NCRB डेटानुसार, 2016 ते 2020 दरम्यान देशात जप्त करण्यात आलेल्या 2000 रुपयांच्या बनावट नोटांची संख्या 2,272 वरुन 2,44,834 वर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार 2016 मध्ये देशात 2000 रुपयांच्या बनावट नोटांची संख्या 2,272 होती.