नागपुर : (चिखली )लग्न समारंभाकरिता परिवारासोबत आलेली एक सहा वर्षीय बालिका ता. १२ रोजी तपोवन देवी परिसरातून हरविली होती. याबाबत अंढेरा पोलिसांत कुटुंबीयांनी तक्रार दिल्यावर सर्वत्र शोधाशोध सुरूवात झाली.
पोलिसांनी नोंद घेत मुलगी हरविल्याबाबत सोशल मिडीयावर फोटोसह माहिती व्हायरल केली. मात्र हरविलेल्या निरागस राधिका विलास इंगळे हिचा मृतदेहच आज ता. १३ रोजी दुपारी मंदिराच्या मागील परिसरात आढळून आला. यामुळे एकच खळबळ उडाली. दगडाने ठेचून खून झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील विलास इंगळे हे लग्नाकरिता चिखलीला आले होते. तालुक्यातील तपोवन देवी संस्थान, रोहडा येथे काल ता. १२ रोजी लग्न असल्यामुळे ते तपोवनला कुटुंबासह उपस्थित होते.
दरम्यान खेळताना त्यांची मुलगी राधिका(वय ६) गायब झाली. सर्वत्र शोधाशोध झाल्यानंतरही ते मिळत नसल्याने अखेर कुटुंबीयांनी अंढेरा पोलिसांत तक्रार दिली. अंढेरा पोलिस ठाणेदार गणेश हिवरकर यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी राधिकाचा शोध घ्यायला सुरुवात केली. समाज माध्यमावर फोटोसह माहिती व्हायरल केली.
मात्र आज १३ मे रोजी तपोवन देवीच्या मंदिराच्या मागील परिसरात ५०० मीटरच्या अंतरावरील डोंगराळ भागात राधिकाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. सदर बालिकेचा चेहरा पूर्णपणे दगडाने ठेचण्यात आला असून अंगावरचे सर्व कपडे व्यवस्थित असल्याची माहिती पोलिसांनी सांगितली.