ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्रशिक्षणसंपादकीय

रानभाजी – काटेमाठ औषधी गुणधर्म


शास्त्रीय नाव – Amaranthus spinosus …………..(ॲमरेन्थस स्पायनोसस)
कुळ – Amaranthacear (ॲमरेन्थेसी)
इंग्रजी नाव – प्रिकली अॅमरेन्थ
हिंदी नाव – कांटा चौलाई

पावसाळ्यात पडीक- ओसाड जमिनीवर, रस्त्यांच्या कडेस, शेतात, कचऱ्याच्या ढिगांवर, सर्वत्र तण म्हणून काटेमाठ ही वनस्पती वाढलेली आढळते. काटेमाठ साधारणतः एक ते दोन फुटांपर्यंत उंच वाढते.

खोड – गोलाकार, सरळ उंच वाढणारे. फांद्या अनेक, हिरवट, लालसर पानांच्या बेचक्यातून अर्धा इंच लांब काटे तयार होतात.

पाने – साधी, एका आड एक, २ ते ६ सें.मी. लांब व ०.५ ते ३.५ सें.मी. रुंद, अंडाकृती, विशालकोनी.

फुले – लहान, एकलिंगी, नियमित, हिरवट-पिवळसर, फांद्यांच्या टोकांवर तसेच पानांच्या बेचक्यांतून तयार होणाऱ्या लांबट पुष्पमंजिरीत येतात. नरफुले व मादीफुले संख्येने विपुल, एकाच पुष्पमंजिरीत येतात. पुष्पकोष ५ पाकळ्यांचा, पाकळ्या तळाकडे चिकटलेल्या. पुंकेसर ५. बीजांडकोष एक कप्पी, परागवाहिन्या दोन.

नवगण न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे🪀क्लिक करा !

फळे – लहान, बोंडवर्गीय लंबवर्तुळाकृती, वरचा भाग जाड, सुरकुतलेला. बिया २ ते ३, चकचकीत काळसर, गोल आकाराच्या. काटेमाठ या वनस्पतीला सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यांत फुले व फळे येतात.

औषधी गुणधर्म
काटेमाठ शीतल, मूत्रजनन, स्तन्यजनन, दीपक, संसर्गरक्षक, सारक, ज्वरशामक गुणधर्मांची आहे. – काटेमाठची मुळे औषधात वापरतात. भूक वाढविणारी आहे. पित्तप्रकोप, रक्तविकार, श्वासनलिका दाह, मूळव्याध, श्वेतप्रदर या विकारांवर काटेमाठ गुणकारी आहे.
काटेमाठ गर्भाशयास शक्ती देणारी आहे. काटेमाठामुळे गर्भाशयशूल कमी होतो आणि रक्त वाहणे बंद होते. गर्भपात होण्याची सवय काटेमाठाने कमी होते. गरोदरपणात मुळांचा काढा तीन-चार दिवस देतात.
काटेमाठाच्या मुळांचा काढा परम्यात देतात. काढ्यात काटेमाठबरोबर आघाडा व ज्येष्ठमध द्यावा. यामुळे पुष्कळ लघवी होऊन परमा धुऊन जातो.
इसब या त्वचारोगात दाह कमी करण्यासाठी काटेमाठाची पाने वाटून लेप करतात.
गळवे लवकर पिकण्यासाठी मुळाचा लेप करतात.
काटेमाठाची पाने व मुळे उकळून लहान मुलांना विरेचक म्हणून देतात. मूळ ज्वरनाशक तसेच दुग्धवर्धक म्हणून वापरतात.
दूध वाढण्यासाठी काटेमाठाचे खोड व पाने तुरीच्या डाळीबरोबर उकडून देतात.\
काटेमाठाची भाजी
काटेमाठाची कोवळी पाने व कोवळ्या फांद्या भाजी करण्यासाठी वापरतात. काटेमाठाची भाजी पाैष्टिक असून, पचनास हलकी आहे. बाळंतिणीच्या खाद्यात भाजी असल्यास तिच्या अंगावरील दूध वाढण्यास उपयुक्त ठरते.
अतिरजस्राव, श्वेतप्रदर या स्त्रियांच्या विकारांत ही भाजी खाल्ल्याने गुण येतो. गर्भाशय शैथिल्य, सूज यावरही काटेमाठची भाजी उपयोगी पडते. गरोदरपणात ही भाजी वरचेवर खाल्ल्याने गर्भपात होण्याचे टळते व गर्भाचे नीट पोषण होते.
काटेमाठाची मोकळी भाजी
साहित्य- काटेमाठाची ताजी कोवळी पाने, कांदा, लसूण, मीठ, हिरव्या मिरच्या, ओले खोबरे, तेल, फोडणीचे साहित्य इ.

कृती – पाने निवडून स्वच्छ धुऊन घ्यावीत. नंतर पाने चिरून घ्यावीत. कांदा व मिरच्या चिरून घ्याव्यात. चिरलेले कांदे फोडणीत तांबूस होईपर्यंत परतावेत. मिरच्यांचे तुकडे व लसणाच्या पाकळ्या फोडणीतच टाकाव्यात. नंतर त्यात चिरलेली भाजी घालावी. गरज वाटल्यास एखादा पाण्याचा हबका मारावा व झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यावी. भाजी परतून अर्धवट शिजल्यावर चवीनुसार मीठ घालावे. भाजी शिजत आल्यावर ओले खोबरे व कोथिंबीर घालावी.

काटेमाठाची पातळ भाजी
साहित्य – काटेमाठाच्या कोवळ्या फांद्या व कोवळी पाने, तुरीची डाळ, हिरव्या मिरच्या, लसूण, गूळ, आमसूल, कांदा, तेल, हळद, मीठ, फोडणीचे साहित्य इ.

कृती – भाजी स्वच्छ धुऊन घ्यावी. कोवळ्या फांद्या व पाने देठासहित बारीक चिरून घ्यावीत. तुरीची डाळ चांगली शिजवून घ्यावी, त्यात मीठ, हळद, पाणी घालून चांगली घोटावी. तेलात मोहरी, मिरच्यांचे तुकडे, लसणाच्या पाकळ्या टाकून तळाव्यात. नंतर त्यात चिरलेली भाजी घालून परतून घ्यावी. दोन-तीन वाफा आल्यानंतर त्यावर घोटलेली डाळ ओतावी. अशा प्रकारे काटेमाठाची पातळ भाजी तयार करता येते.

नवगण न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे🪀क्लिक करा !


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *