धक्कादायक! ‘ते’ महिलांना महाराष्ट्र सीमेवरून कर्नाटकात नेत, प्रत्येकीसाठी 50 हजार रुपयांची फी, धाराशिव पोलिसांनी असा केला भांडाफोड
मुलगा असो वा मुलगी हा भेद आता कालबाह्य झाला आहे. दोघांनाही समान वागणूक, समान शिक्षण, समान अधिकारासाठी मोठी जनजागृती केली जातेय.
मात्र अजूनही महिलांच्या पोटात वाढणारा गर्भ मुलगा आहे की मुलगी हे जाणून घेण्यासाठी कोणतीही किंमत मोजणारे कमी नाहीत. याच दुष्प्रवृत्तीचा फायदा घेत कायद्याविरोधात जात अजूनही गर्भलिंग निदान करणारे रॅकेट महाराष्ट्रात सर्रास चालतायत. धाराशिव पोलिसांनी नुकताच अशा एका रॅकेटचा भांडाफोड केला. पोटातलं अपत्य मुलगा आहे की मुलगी हे तपासण्यासाठी या रॅकेटमधील लोक महिलांना महाराष्ट्रातून कर्नाटकात नेत असत, प्रत्येकीकडून 50 हजार रुपयांचे शुल्कही आकारले जात असत. पोलिसांनी नुकतंच याविरोधात सापळा रचून मोठी कारवाई केली.
असा रचला सापळा…
उमरगा हा भाग कर्नाटक सीमेजवळ असल्याने त्या भागात जाऊन गर्भलिंग तपासणी केली जाते, यापूर्वी सुद्धा असे प्रकार उघड होऊन गुन्हे नोंद केले आहेत तरी देखील हे रॅकेट चालूच आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. खबऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सदर परिसरावर नजर ठेवली. खबरींनी सांगितल्या प्रमाणे एक दलाल गर्भवती महिलांना तपासणीसाठी कर्नाटक राज्यात घेऊन जात होता. त्याच वेळी पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडलं. गर्भलिंग तपासणीसाठी हा दलाल प्रत्येक महिलेकडून 50 हजार रुपये घेत असे. मुलगा की मुलगी याचे निदान करीत होता.
यावेळीही कर्नाटक कनेक्शन
यापूर्वीदेखील उमरगा भागात अशा प्रकारचे रॅकेट उघडकीस आले होते. नुकत्याच पोलिसांनी केलेल्या कारवाईतदेखील अवैध गर्भलिंग तपासणीचे कर्नाटक कनेक्शन उघड झाले आहे. या रॅकेटमध्ये अजून किती जणांचा समावेश आहे, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. धाराशिव पोलिसांनी उमरगा येथे मोठी कारवाई करीत अवैध गर्भलिंग तपासणी करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड केला आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर सापळा रचत या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईनंतर आरोग्य विभाग तक्रार देत असुन गुन्हा नोंद करण्याची पुढील प्रक्रिया सुरु आहे.
उमरगा हा भाग कर्नाटक सीमेजवळ आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणे सोपे आहे. याचाच फायदा घेत त्या भागात जाऊन गर्भलिंग तपासणी केली जाते, यापूर्वी सुद्धा असे प्रकार उघड होऊन गुन्हे नोंद केले आहेत तरी देखील हे रॅकेट चालूच आहे.
मुलगा मुलगी हा भेद करणे चुकीचे असुन गर्भलिंग तपासणी हा कायद्याने गुन्हा आहे त्यामुळे नागरिकांनी असे प्रकार कुठे सुरु असल्यास त्याची गोपनीय माहिती आरोग्य व पोलीस विभागाला द्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी केले आहे.