बँकेत पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका अंगणवाडी कार्यकर्तीने कॅशिअरने दिलेले ७६ हजार रुपये मोजण्यासाठी तेथील एका व्यक्तीच्या हातात दिले.
त्या व्यक्तीने नोटा मोजून परत दिल्यानंतर अंगणवाडी कार्यकर्ती निघून गेली. परंतु कपड्यांची खरेदी करीत असताना त्यांच्या बॅगेत केवळ २६ हजार रुपये निघाले. नोटा मोजणा-या व्यक्तीने त्यांची नजर चुकवून तब्बल ५० हजार रुपयांवर डल्ला मारला होता.
कुसुम शंकरराव शिंदे रा. उल्हासनगर असे अंगणवाडी कार्यकर्तीचे नाव आहे. ३ एप्रिल रोजी त्या वजिराबाद भागात एसबीआय बँकेत गेल्या होत्या. स्लीप भरून बँकेतून ७६ हजार रुपये काढले. परंतु पैसे मोजता येत नसल्याने त्यांनी तेथेच असलेल्या एकाकडे पैसे मोजण्यासाठी दिले. आरोपीने पैसे मोजताना त्यांची नजर चुकवून ५० हजार रुपये खिशात घातले अन् २६ हजार रुपये शिंदे यांच्याकडे दिले. शिंदे यांनीही ते पैसे बॅगेत ठेवले. त्यानंतर कपडे खरेदीसाठी दुकानात गेल्या. कपड्यांची खरेदीही केली. परंतु बॅगेत केवळ २६ हजार रुपये आढळून आले. पैसे मोजणा-या व्यक्तीनेच ५० हजार रुपये लांबविले असा त्यांना संशय आला. या प्रकरणात त्यांनी वजिराबाद पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे..