ताज्या बातम्यामहाराष्ट्रसोलापूर

अपघाती मृत्यूची जबाबदारी कोणाची? सव्वावर्षात ८९० मृत्यू; अपघात राखणारी यंत्रणा दंड वसुलीत; रस्ता सुरक्षा समित्या कागदावर


महामार्गांच्या कनेक्टिव्हीटीमुळे जिल्ह्याच्या विकासाला निश्चितपणे चालना मिळाली. पण, वाहन चालकांचा बेशिस्तपणा, आणि रस्त्यांच्या समस्यांकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष, अशा कारणांमुळे रस्ते अपघात वाढले आहेत.

तरीदेखील अपघात रोखण्यापेक्षाही नुसता दंड वसुलीवरच पोलिस व आरटीओ विभागाचा भर आहे. धक्कादायक बाब म्हणजे जानेवारी २०२२ ते ३१ मार्च २०२३ या १५ महिन्यांत सोलापूर जिल्ह्यातील अपघातांमध्ये ८९० जणांचा (शहरातील ९९, ग्रामीणमधील ७९१) मृत्यू झाला आहे.

रस्त्यांवरील खड्डे वेळेत बुजवले जावेत, सोलापूर-पुणे, सोलापूर-तुळजापूर, सोलापूर-हैदराबाद, सोलापूर-विजयपूर, सोलापूर-मंगळवेढा, अशा महामार्गांवर संरक्षित जाळी बसवावी, गरजेच्या ठिकाणी वीजेचे खांब बसवणे व अपघातप्रवण क्षेत्रात विशेषतः: वळण रस्त्यावर दिशादर्शक फलक लावणे, तुटलेली जाळी तत्काळ दुरुस्त करणे, महामार्गांवर थांबलेली वाहने लगेचच तेथून बाजूला करणे, अशी कामे तातडीने करणे गरजेचे आहे.

मात्र, सध्याची वस्तुस्थिती वेगळीच आहे. वाढत्या अपघाताला निश्चितपणे बेशिस्त वाहन चालक तेवढेच जबाबदार आहेत, पण अनेक अपघातांमध्ये निरापराधांनाही जीव गमवावा लागला आहे. त्यात नवविवाहितेचा पती, चिमुकल्यांचा वडील, वयस्क आई-वडिलांचा आधार हिरावला.

पण, महामार्गाची देखभाल करण्यासाठी ‘एनएचआय’, ब्लॅकस्पॉटवर उपाययोजनांसाठी ‘पीडब्ल्यूडी’, बेशिस्तांवरील कारवाईसाठी आरटीओ, स्थानिक पोलिस, ग्रामीण व शहर वाहतूक शाखेचे पोलिस आणि त्या सर्वांच्या कामांवर वॉच ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी व खासदारांच्या अध्यक्षतेखालील रस्ता सुरक्षा समिती कार्यरत असतानाही अपघात वाढतातच कसे, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Solapur : जिल्ह्यातील १००० शेतकऱ्यांना ट्रॅक्टर; ५०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांना मिळणार शेततळे

आता अपघात कमी करण्यावर सर्वाधिक भर

जिल्ह्यातील रस्ते अपघात रोखण्यासाठी काटेकोर नियोजन केले जात आहे. सर्व यंत्रणांच्या समन्वयातून सर्वाधिक अपघात होणाऱ्या ठिकाणी ठोस उपाययोजना केल्या जातील. इंटरसेफ्टर वाहनांचे मार्ग निश्चित करणे, वाहतूक पोलिसांचे मनुष्यबळ वाढवून बेशिस्तांवर अधिकाधिक कारवाया केल्या जातील. महामार्गांवर वाहतूक सुरक्षेसंदर्भातील फलक कमी असून ते वाढविण्यासंबंधी कार्यवाही केली जाईल.

– शिरीष सरदेशपांडे, पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण

‘एनएचआय’ अन्‌ ‘पीडब्ल्यूडी’ काय करतंय?

महामार्गांवरील वाहनांकडून टोल वसूल करणारी यंत्रणा असो वा रस्त्यांची देखभाल करणारा ‘एनएचआय’ विभाग असो, यांना अपघातानंतर तुटलेली लोखंडी जाळी वेळेवर दुरुस्तीसाठी वेळ नाही. महामार्गांवर वाहतूक सुरक्षेसंबंधीचे पुरेसे फलक दिसत नाहीत. तांत्रिक बिघाडामुळे रस्त्यांवर थांबलेली वाहने काही दिवस तेथेच दिसतात.

कोंडीजवळील पुलाजवळ मागच्या वर्षी वारकऱ्यांच्या ट्रॅक्टरला अपघात होऊन सहा-सात जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर तेथे वीजेचे खांब बसविण्याची मागणी झाली, पण त्याकडेही गांभीर्याने पाहिले नाही.

मात्र, काही अधिकारी सण-उत्सव काळात आपल्या चुका झाकल्या जाव्यात म्हणून आवर्जून वरिष्ठ अधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून त्यांच्या कार्यालयात जातात, अशी चर्चा आहे. दुसरीकडे ब्लॅकस्पॉटवर (अपघातप्रवण ठिकाणे) काही दुरुस्तीची गरज असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काहीच कार्यवाही वेळेवर होत
नसल्याची वस्तुस्थिती आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *