नरेंद्र मोदी यांनीच जीवनावश्यक औषधांच्या किमतीमध्ये वाढ करून लोकांच्या खिशातून पैसे काढून घेण्याची ‘सुपारी’ घेतली आहे, असे प्रत्युत्तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी रविवारी ट्वीट करून दिले.
तर पंतप्रधानांची अशा लोकांची नावे उघड करावीत आणि त्यांच्यावर खटला चालवावा, असे आवाहन राज्यसभा सदस्य कपिल सिबल यांनी केले.
विरोधकांनी माझी बदनामी करण्याची देशातील आणि परदेशातील लोकांशी संधान साधून ‘सुपारी’ घेतली आहे, असे विधान पंतप्रधानांनी शनिवारी भोपाळ येथे वंदे भारतच्या लोकार्पण सोहळय़ादरम्यान केले होते. त्याला खरगे यांनी उत्तर दिले. या महिन्यापासून सुमारे ३८४ जीवनावश्यक औषधे आणि एक हजारांपेक्षा इतर औषधांच्या किमती वाढल्या आहेत. त्यावरून खरगे यांनी पंतप्रधानांवर टीका केली. तर, देशातील आणि परदेशातील लोकांना ही ‘सुपारी’ देण्यात आल्याचे पंतप्रधान म्हणतात, त्यांनी अशा व्यक्तींची, संस्थांची किंवा देशांची नावे उघड करावीत अशी मागणी सिबल यांनी केली. ही बाब गोपनीय ठेवता येणार नाही, त्यांच्यावर खटला चालवूया असे ते म्हणाले.