स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या बेदरकारपणे चाललेल्या बांधकामांमुळे मेटाकुटीस आलेल्या राजधानीतील नागरिकांना दिलासा देण्यासाठी गोवा सरकारने एका महिन्याचा पणजी बंद लॉकडाऊन आज जाहीर केला.
गोवा विधानसभेचे अधिवेशन संपल्याच्या रात्रीच विशेष मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय होऊन त्याची कार्यवाही 1 एप्रिलच्या पहाटेपासून सुरू केली जाईल.
शनिवारी सर्व वाहने पणजीमध्ये येण्यापासून रोखून ठेवली जातील. शहरातून बाहेर जाणाऱ्या वाहनांना दुपारी एकपर्यंत मुभा राहील. केवळ अग्निशामक व रुग्णवाहिका यांना शहरात फिरण्यास अनुमती आहे.
एक वाजल्यानंतर मात्र लॉकडाऊनची कठोर कारवाई सुरू होणार आहे. त्यात मच्छी व भाजी मार्केट बंद ठेवण्याचाही निर्णय समाविष्ट आहे.
‘पोलिस खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना शहराचे शेरीफ म्हणून एका महिन्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे. त्यांना लॉकडाऊनची कडक कार्यवाही करण्याचा आदेश देण्यात आला आहे,’ अशी माहिती एका अधिसूचनेद्वारे राज्य सरकारने रात्री उशिरा जाहीर केली.
पणजी शहराच्या भल्यासाठीच सरकारने लॉकडाऊन पुकारले असून जनतेने त्याकामी संपूर्णत: सहकार्य करावे. या एका महिन्यात स्मार्ट सिटी प्रकल्पाची सर्व कामे संपवली जातील आणि पावसाळ्यात पणजी शहर बुडू नये, यासाठी हा निर्णय कठोरपणे राबविला जाईल
पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी सरकारच्या लॉकडाऊनच्या निर्णयाचे मनःपूर्वक स्वागत केले आहे. ते म्हणाले, मी स्वत:च लॉकडाऊनचा प्रस्ताव सरकारला एका महिन्यापूर्वी दिला होता.
राजधानीत लोकांना अनेक अडचणी सोसाव्या लागत आहेत हे खरेच आहे. परंतु त्याहून मोठे संकट पावसाळ्यात येईल आणि स्मार्ट सिटीचे अधिकारी स्वत: कोणतीही जबाबदारी घेणार नाहीत, हे ओळखून आम्ही हा प्रस्ताव तयार केला होता.
एक महिना संपूर्ण शहर बंद ठेवून सर्व बांधकामे वेगाने संपविण्याचा निर्धार आम्ही केला, असे मोन्सेरात यांनी सांगितले.
आपत्कालीन सेवा सुरूच राहणार; साहित्य घरपोच पुरविण्याची व्यवस्था; नागरिकांना सहकार्याचे आवाहन
मच्छीमारांना सवलत
पणजीमधील हॉटेल्सना सक्तीने बंदी पाळावी लागणार असली तरी त्यांना जर घरपोच जिन्नस पोहोचवायचे असतील तर खास सरकारी सवलत देण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासनाने जाहीर केले आहे.
पणजीतील मच्छी बाजार बंद ठेवण्यास सांगितले असले तरी पणजीतील हॉटेलचालकांना खास स्टिकर देऊन त्यांना मडगावहून मासळी आणण्यास मान्यता दिली आहे.
या काळात पणजीतील लोकांना खास ताजी व स्वच्छ मासळी घरपोच देण्यात येईल. पणजीतील मच्छीमारांना मात्र बंदमधून वगळण्यात आले आहे. सकाळी ७ ते ९ पर्यंत मिरामार येथे त्यांना मच्छी विकण्यास परवानगी असेल.
औषधांवर १५ टक्के सवलत
लॉकडाऊनच्या एका महिन्याच्या काळात आपत्कालीन सेवा सुरू ठेवण्याचा आदेश सरकारने दिला असल्याने आज रात्रीपासूनच रुग्णवाहिका सज्ज ठेवण्याचा आदेश आरोग्य खात्याने दिला. या काळात पणजीतील प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू राहील.
शिवाय पणजीतील सर्व फार्मसींना घरपोच औषधे पोहोचवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या काळात सर्व औषधांवर 15 टक्के सवलत देण्याचेही सरकारने बजावले आहे.
घरातही मास्क वापरा
बंदमधून वगळलेल्या सर्व घटकांना मास्क वापरणे बंधनकारक आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अलगीकरण अत्यंत सक्तीने राबवतानाच प्रत्येकाने मास्क वापरावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
घरामध्येही मास्कचा अवलंब करावा. ज्यांच्याकडे मास्क नाही, त्यांनी फोन केल्यावर ते घरपोच पोचवले जातील, अशी ग्वाही देण्यात आली आहे.