बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन व्यावसायिकाला लुबाडले
पुणे : व्यवसायाबाबत चर्चा करण्याच्या बहाण्याने घरी बोलावून एका तरुणीने व्यावसायिकासोबत फोटो काढले. त्यानंतर या तरुणीचा वकील मित्र आणि तरुणीने बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत व्यावसायिकाकडून १७ लाख ५० हजार रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी हडपसर पोलिसांनी वकिलाला अटक केली आहे.
याबाबत मगरपट्टा सिटी येथील ४२ वर्षीय व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार विक्रम भाटे (वय ३५, रा. हडपसर) याच्यासह एका २५ वर्षीय तरुणीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व्यावसायिक हे ३ ऑगस्ट २०२२ रोजी त्यांच्या मित्र-मैत्रिणीसमवेत सीझन मॉल येथील रेस्टॉरंटमध्ये गेले होते.
त्यावेळी एका तरुणीने लायटरच्या बहाण्याने फिर्यादीसोबत ओळख करुन घेतली. ‘मी मुंबईहून आली असून, बिझनेससाठी तुमची मदत लागेल’, असे सांगून त्यांचा मोबाईल क्रमांक घेतला. त्यानंतर तिने ओळख वाढवून फिर्यादीसोबत व्हॉटसअॅप कॉल सुरु केले. या तरुणीने ७ नोव्हेंबर रोजी फिर्यादीला व्हॉटसअप कॉल करून बिझनेसबाबत बोलायचे आहे, असे सांगून घरी बोलावले. त्यावेळी दोघांनी सोबत फोटो काढले.
त्यानंतर तरुणीच्या वकिलाने कार्यालयात बोलावून घेतले. आरोपींनी ‘तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करून कायमस्वरूपी कारागृहात पाठवू, तसेच जामीनही मिळू देणार नाही’, अशी धमकी दिली. त्यावर सोन्याचे दागिने गहाण ठेवून व्यावसायिकाने काही रक्कम दिली. त्यानंतर पुन्हा वेळोवेळी १७ लाख ५० हजार रुपये घेउन आर्थिक फसवणूक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.