दख्खनचा राजा श्री जोतिबा यात्रा कालावधीत शेंड्या (केसर) काढलेल्या नारळाचीच विक्री करण्याचा आदेश प्रशासनाकडून जारी करण्यात आला आहे.
नारळाच्या शेंड्यांनी मंदिर परिसरात कचरा होऊ नये यासाठी फौजदारी दंड संहिता 144 अन्वये कार्यकारी दंडाधिकारी तथा पन्हाळा तहसीलदार रमेश शेंडगे यांनी प्रतिबंधात्मक आदेश काढला असून तो व्यापाऱ्यांना लागू करण्यात आला आहे. हा आदेश 3 एप्रिल रोजी रात्री बारा वाजल्यापासून ते गुरुवारी 6 रोजी रात्री बारापर्यंत आदेश लागू राहणार आहे. या आदेशानुसार सर्व व्यापाऱ्यांना नारळाच्या शेंड्या काढूनच विक्री करावी लागणार आहे.
तसेच नारळ फोडणाऱ्या पुजाऱ्यांना शेंड्या काढून कचरा करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे आदेशात म्हटले आहे. दरम्यान, जोतिबा यात्रेसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. यात्रेसाठी संपूर्ण महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि गोव्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. या कालावधीत सुमारे आठ ते दहा लाखांवर भाविकांची डोंगरावर उपस्थिती असते.
मंदिरात श्रद्धेपोटी नारळ फोडले जातात. मात्र, नारळ फोडताना शेंड्या काढून भावी कोठेही टाकून जातात. त्यामुळे मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो. यामुळे अपघात होण्याची शक्यताही शक्यता असते. त्यामुळे तोडगा म्हणून शेंडी काढून नारळ विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला.