ताज्या बातम्याधार्मिकमहत्वाचेमहाराष्ट्रसोलापूर

पंढरपुरातील घरात पडला 35 फूट खोल खड्डा, तीन महिलांचा जीव वाचवला..


सोलापूर: पंढरपुरातील एका घरात अचानक मोठा खड्डा पडला आणि त्यात तीन महिला पडल्याची धक्कादायक घटना आज घडली. हा खड्डा तब्बल 30 ते 35 फुट इतका होता, त्यामुळे या महिलांना मोठ्या शिताफीने वाचवण्यात यश आलं आहे.

अचानक घडलेल्या या घटनेमुळे भीतीचं वातावरण पसरल्याचं दिसून आलं.

पंढरपूर शहरातील कोळी गल्ली परिसरातील राहुल शिंदे यांच्या घराला 30 ते 35 फूट खोल पेव पडल्याने यात तीन महिला पडल्या. प्रशासनाला येण्यास दिरंगाई होत असल्याने अखेर स्थानिक कार्यकर्त्यांनी साड्यांना गाठी बांधून या महिलांचे प्राण वाचवले. अचानकपणे आज दुपारी दोनच्या सुमारास राहुल शिंदे यांच्या घरातील फरशी खाली आरली आणि जवळपास 30 ते 35 फूट खोल खड्डा पडला. राहुल यांच्या कुटुंबातील एक महिला या खड्ड्यात पडल्यानंतर ती ओरडू लागली. तिच्या या ओरडण्याने शेजारील एक महिला काय झालं आहे हे पाहण्यासाठी आली आणि तिलाही या खड्ड्याचा अंदाज न आल्याने तीदेखील खाली पडली.

यानंतर राहुल शिंदे यांची 89 वर्षाची आई देखील या खड्ड्यात पडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले. नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाला याबाबत फोनद्वारे कळवूनही अग्निशमन यंत्रणा पोचण्यास वेळ लागू लागल्याने परिसरातील स्थानिक कोळी समाजाचे कार्यकर्ते या खड्ड्यात उतरले आणि त्यांनी साड्यांची गाठी बांधत या महिलांना खड्ड्यातून बाहेर काढले.

या खड्ड्यात महिला पडल्या तेथे पाणी होते, वरून दगड माती पडत असल्याने त्यांना तातडीने वाचवणे गरजेचे होते. अशातच स्थानिक नागरिकांनी धाडस दाखवत या खोल खड्ड्यात उतरून महिलांना बाहेर काढलं. नंतर या महिलांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

प्रशासनाला कळवूनही दिरंगाई झाल्याने राहुल शिंदे यांनी संताप व्यक्त केला. स्थानिक मदत मिळाल्यानेच या तीन महिलांचे प्राण वाचू शकल्याची भावना त्यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केल्या. दरम्यान नगरपालिका प्रशासनाने आता हे पेव बुजविण्याचे काम सुरु केले असून हा खड्डा आता दगड आणि मुरुमाने भरून घेतला जात आहे .

वारंवार येणाऱ्या पुरामुळे या ठिकाणची जमीन गाळाची बनल्याने असे पेव पडत असल्याचं नागरिकांनी सांगितलं. सुदैवाने ही घटना दिवसा घडल्याने त्यांना तात्काळ मदत मिळाली. आता अशा धोकादायक बनलेल्या इमारतींची तपासणी प्रशासनाने हाती घेणे गरजेचे आहे. कारण पंढरपुरातील अशा अनेक घरांमध्ये वारकरी वास्तव्याला उतरतात, त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना होऊ शकते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *