सोन्याचे होलसेल व्यापारी नितीन उदावंत यांच्या मृत्यू प्रकरणी; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
सोन्याचे होलसेल व्यापारी नितीन उदावंत यांच्या मृत्यू प्रकरणी; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
_____________________________
दोन लाखांचे सोने घेऊन पैसे देण्यास नकार; पैसे मागितले असता शिवीगाळ करत दमदाटी करून पाजले होते विष
___________________________
गेवराई : बीड जिल्ह्यातील गेवराई शहरातील अहिल्यानगर येथील नितीन उदावंत हे गेल्या तीन वर्षांपासून वाघोली ता.जि. पुणे येथे राहुन सोन्याचा व्यवसाय करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. राजीव गोल्ड नावाचे घरीच असणाऱ्या दुकानातून नितीन उदावंत हे सोन्याचे होलसेलचा व्यापार करत होते.
सविस्तर माहिती अशी की, नितीन उदावंत यांनी ओम छगनराव टाक व प्रशांत छगनराव टाक (रा. दोघे पाथर्डी,जि. अहमदनगर) यांना निलेश सुधाकर माळवे (रा.गेवराई ता.गेवराई जि.बीड) यांच्या मध्यस्थीने सुमारे दोन लाखांचे सोने विक्री केले होते. त्यांची उधारी बाकी असून त्यांना उधारी मागितली असता आज देतो उद्या देतो असे मागील काही महिन्यांपासून म्हणत असून बाकी असलेली दोन लाख रुपये उधारी देत नव्हते. तसेच नितीन उदावंत यांनी पैशाची मागणी केल्याच्यानंतर ते नेहमी नितीन उदावंत यांना शिवीगाळ करून धमकी देत होते की, तु पाथर्डीत ये तुला सांगतो असा सारखा दम देत होते. तसेच याबाबत मोबाईल वरील संभाषणही त्यांचा भाऊ किरण उदावंत यांना मयत नितीन उदावंत यांनी ऐकवले होते. (दि.१६ मार्च २०२३) रोजी मयत नितीन उदावंत हे त्यांचे भाऊ किरण उदावंत यांच्या गेवराई येथील घरी आले होते. त्यावेळी त्यांनी भाऊ किरण उदावंत यांना सांगितले होते की, आजच ओम छगनराव टाक व प्रशांत छगनराव टाक (दोघे रा. पाथर्डी जि.अहमदनगर) यांच्याकडे जाऊन आलो असून त्यांना उधारीचे राहिलेले दोन लाख रुपये मागितले असता तेव्हा त्यांनी पुढील आठवड्यात या आणि तुमचे दोन लाख रुपये देऊन टाकतो असे सांगितले असल्याचे सांगून नंतर ते त्याच दिवशी वाघोली ता.जि. पुणे येथे त्यांच्या घरी निघून गेले होते.
दि,२५ मार्च २०२३ रोजी नितीन उदावंत हे ओम छगनराव टाक व प्रशांत छगनराव टाक यांच्याकडे असलेली दोन लाख रुपये उधारी वसूली करण्यासाठी आले होते. परंतु उधारीचे पैसे न देता त्यांना शिवीगाळ करत दमदाटी करून वारंवार उधारीचे पैशासाठी मानसिक त्रास दिला जात होता. नितीन उदावंत यांना ओम छगनराव टाक, प्रशांत छगनराव टाक (दोघे रा.पाथर्डी) व मध्यस्थी निलेश सुधाकर माळवे (रा.गेवराई,जि.बीड) यांनी कोणतातरी द्रव सदृश्य पदार्थ सेवन करण्यास भाग पाडून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता भाऊ किरण उदावंत यांना त्यांच्या मावस भाऊ मच्छिंद्र बांगडे (रा.बीड) यांचा फोन आला व फोनवर सांगितले की. नितीन उदावंत यांचा मला मेसेज आला असून काय झाले आहे ते पहा त्यानंतर लगेच भाऊ किरण उदावंत यांनी त्यांच्या फोनवरून दोन वेळेस फोन केला परंतु त्यांने फोन उचलला नाही. त्यानंतर पुन्हा फोन केला पण नितीन उदावंत यांनी फोन उचललाच नाही. नंतर काही वेळाने मोठा भाऊ अमोल उदावंत यांचा फोन आला व फोनवर सांगितले की. मी नितीन याच्या फोनवर फोन केला होता परंतु फोन एसटी कंडक्टरने उचलला असल्याचे सांगून नितीन यास बसमध्ये करंजी घाट पाथर्डी येथे त्रास होत आहे आणि अटॅक सारखा प्रकार आला असल्याचे सांगून ॲम्बुलन्स मागवली असल्याचे कंडक्टर यांनी सांगितले.
त्यानंतर आई, दोघे भाऊ, व सोबत नातेवाईक असे पाच जण गेवराई येथून गाडी करून उपजिल्हा रुग्णालय पाथर्डी येथे ९ वाजता पोहचले होते. परंतु वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले की. नितीन उदावंत हे उपचारापूर्वीच मयत झाले याप्रकरणी मयत नितीन उदावंत याचा भाऊ किरण उदावंत यांच्या फिर्यादीवरून ओम छगनराव टाक, प्रशांत छगनराव टाक व निलेश सुधाकर माळवे यांच्याविरोधात आज दि,२६ मार्च रोजी
पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पाथर्डी पोलीस करत आहेत