एक अनोखी शाळा आणि अनुकरणीय उपक्रम
विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणिवा वाढवत नेणे आजच्या घडीला खूप महत्वाचे होत चालले आहे. मी, माझे कुटुंब, माझी जात आणि माझी भाषा यापुढे जात सकल समाज माझे विस्तारित कुटुंब आहे ही भावना विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित करणे खूप महत्वाचे होत चालले आहे.
आजच्या घडीला मोठ्या मोठ्या संस्था खूपच कुपमंडुक होताना दिसत आहेत. तर काही संस्थांचा आकार इतका मोठा झाला आहे की त्यांना स्वतःचा भार सांभाळणे अवघड होतं चालले आहे.
यासर्वाला अपवाद म्हणजे अंबाजोगाईची स्वामी विवेकानंद बाल विद्या मंदिर ही शाळा. योगायोगाने मी अगदीच सुरुवाती पासून या शाळेच्या उभारणीत आहे. सध्या संतोषदादा आणि स्वरूपाताई या शाळेची धुरा सांभाळतात. दिपाताई आणि सगळा शिक्षक वृंद अपार मेहनत घेतात. अगदीच सुरुवाती पासून ‘समाज परिवर्तनातून व्यक्तिमत्व विकास’ हा एक हेतू ठेवून शाळेचे काम चालू आहे. आजच्या घडीला गेल्या दोन दशकात शाळा आपला हेतू मात्र विसरली नाही याचा अनुभव काल आला.
शाळेत दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आनंद नगरी होती. पालकांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी खरी कमाई करण्याचा हा उपक्रम. आपण केलेल्या खऱ्या कमाईतुन आपल्या वंचित समाज बांधवांच्यासाठी काही तरी केलं पाहिजे हे सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षकांनी ठरवले. आपल्या खऱ्या कमाईतील काही भाग आनंदी मनाने त्यांनी ज्ञान प्रबोधिनीच्या माध्यमातून चालणाऱ्या नागरी वस्तीच्या कामासाठी दिला. शाळा दरवर्षी दिवाळी साजरी करते. मागच्या दिवाळीच्या वेळी शाळेतील काही विद्यार्थी वस्तीवर येऊन त्यांनी मुलांच्या बरोबर दिवाळी साजरी केली होती. असे अनेक सामाजिक उपक्रम विद्यार्थ्यांना लहान वयातच माहित होतात व त्यांच्या सामाजिक जाणिवा प्रगल्भ होतात….सर्व शाळांच्यासाठी हे खूप अनुकरणीय आहे !!
स्वामी विवेकानंद बाल विद्या मंदिरच्या सर्व शिक्षक,पालक आणि विद्यार्थी यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार !!