बीड १८ पैकी १७ जागा आता भाजपच्या ताब्यात राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का
बीडमध्ये धारुर कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपने मोठा विजय मिळवला आहे. १८ पैकी १७ जागा आता भाजपच्या ताब्यात आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांच्या पॅनलचा या ठिकाणी दारुण पराभव झाला आहे.
काल गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली, आज याचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये १८ पैकी १७ जागा भाजपच्या ताब्यात आल्या आहेत. शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर ही पहिली बाजार समितीची निवडणूक होती. त्यामुळे यात पंकजा मुंडेंचा विजय मानला जात आहे. हा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे.
सध्या बीड जिल्ह्यात प्रत्येक निवडणूक ही अटीतटीची मानली जात आहे. एकीकडे भाजप नेत्या पंकजा मुंडे तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे माजी मंत्री धनंजय मुंडे या दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली होती. यावेळी पंकजा मुंडेंच्या गटाने बाजार समितीमध्ये राष्ट्रवादीच्या गटाचा दारुण पराभव केला आहे.
याआधी, बीडच्या परळी येथील पांगरी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या गटाचा दारुण पराभव झाला होता. धनंजय मुंडे यांच्या गटाचे सर्वच उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते.