चोरी झाल्यानंतर 11 महिन्यांनी गुन्हा दाखल,पोलिस अधिक्षकांकडून चौकशीचे आदेश
बीड : प्रवासादरम्यान बसमधून दागिन्यांची चोरी झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर बीड पोलिसांनी तब्बल 11 महिन्यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय. उस्मानाबादमधील अण्णासाहेब देखमुख यांनी याबाबत बीड पोलिस ठाण्यात जानेवारी 2022 मध्ये आपले दागिने चोरी झाल्याची तक्रार दिली होती. परंतु, त्याचा गुन्हा आता दाखल झालाय.
उस्मानाबादमधील अण्णासाहेब देशमुख (वय 70) आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मी देशमुख (वय 65, दोघेही रा. उस्मानाबाद) हे 12 जानेवारी 2022 रोजी औरंगाबादहून बीडकडे येत होते. यावेळी त्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव गळ्यातील दागिने काढून एका पिशवीत ठेवले होते. परंतु, बसमधून त्यांची दागिने ठेवलेली बॅग चोरीला गेली. पाडळसिंगी येथील टोल नाक्यावर आल्यावर त्यांना याची कल्पना आली. त्यानंतर त्यांनी लगेच तक्रार देण्यासाठी बीडमधील शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठले. परंतु, शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गेलेल्या वृद्ध दाम्पत्याला हा गुन्हा आमच्या हद्दीत घडलेला नाही, तुम्ही गेवराईला जा असे पोलिसांनी सांगितले. त्यानुसार हे दाम्पत्य गेवराई पोलिस ठाण्यात गेले. परंतु, तेथील पोलिसांनी त्यांना पुन्हा बीडला पाठवले. गेवराईवरून हे दाम्पत्य पुन्हा शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आले. त्यावेळीही शिवाजीनगर पोलिसांनी त्यांना पुन्हा गेवराईलाच जाण्यास सांगितले. त्यानंतरही गेवराई पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही. शेवटी आमदारांना फोन लावतो असे म्हणताच गेवराई पोलिसांनी तक्रार नोंदवून ती शिवाजीनगर पोलिसांना पाठवली.
बुधवारी अण्णासाहेब देखमुख यांच्या मोबाईलची घंटी वाजली आणि त्यांना बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यातून बोलतोय असं म्हटल्यावर त्यांना आनंद वाटला. मात्र पुढे बोलताना पोलिस कर्मचारी म्हणाले की तुम्ही दिलेल्या तक्रारीवरून आम्ही चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. हे शब्द ऐकताच अण्णासाहेब हाताश झाले. कारण, हा सर्व प्रकार घडला 12 जानेवारी 2022 रोजी आणि गुन्हा दाखल झालाय तब्बल अकरा महिन्यांनी म्हणजे 14 डिसेंबर 2022 रोजी. गेवराई पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर या दांपत्याला वाटलं की आता आपण दिलेल्या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल झाला असेल. त्यानंतर आपल्या झालेल्या दागिन्यांच्या चोरीचा तपास पोलिस करत असतील पण तसे झालेच नाही. तर त्यांना फक्त गुन्हा दाखल झाल्याची माहिती देण्यासाठी पोलिसांनी फोन केला.
कोणताही गुन्हा ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडतो त्याच ठिकाणी त्या संदर्भातील गुन्हा दाखल होतो हा सर्वसामान्य नियम सर्वांना परिचित आहे. परंतु, एखादं वयोवृद्ध दाम्पत्य प्रवासादरम्यान घडलेल्या घटनेची फिर्याद जर पोलिसांकडे घेऊन येत असेल आणि पोलिस जर त्यांना एका पोलिस स्टेशनवरून दुसऱ्या पोलिस स्टेशनमध्ये चकरा मारायला लावत असतील तर मग हा हद्दीचा नियम किती जाचक आहे हे यावरून लक्षात येतं, असा संपात अण्णासाहेब देशमुख यांनी व्यक्त केलाय.
प्रकरणातील मुख्य प्रश्न आता बाजूलाच राहिलाय. कारण दागिन्याची चोरी जानेवारी महिन्यात झाली, त्या संदर्भातील गुन्हा दाखल व्हायला 11 महिन्याचा कालावधी लागल्याने आता पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये दोषी असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई देखील होईल. मात्र 11 महिन्यानंतर पोलिस रेकॉर्डवर आलेल्या या चोरीचा तपास करण्यासाठी पोलिस आणखी किती महिन्यांचा अवधी घेणार प्रश्न अनुत्तरीतच आहे.