वाढीव दराने बियाणे विकणाऱ्या कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित; हिंगोलीत कृषी विभागाची कारवाई
राज्यातील अनेक जिल्ह्यात वाढीव दराने बियाणे विकण्यात येत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहे. दरम्यान ‘एबीपी माझा’ने वाढीव दराने बियाणे विकणाऱ्या कृषी सेवा केंद्र चालकांचे स्टिंग ऑपरेशन करून हा सर्व प्रकार समोर आणल्यावर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी कारवाईचे आदेश दिले आहे.
तर कृषीमंत्री यांच्या आदेशानुसार हिंगोली जिल्ह्यात देखील वाढीव दराने बियाणे विकणाऱ्या कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित करण्यात येत आहे. तर जिल्ह्यातील अशाच पाच दुकानांची परवाने रद्द करण्यात आले आहे.
खरीप हंगाम सुरु झाला असून, हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून शेतीसाठी लागणारे बियाणे, खते व औषधे इत्यादीची खरेदी सुरु आहे. तर जिल्ह्यात बियाणे, खते यांचा मुबलक प्रमाणात साठा देखील उपलब्ध आहे. दरम्यान कापसाची पेरणी करताना शेतकऱ्यांचा कल बीटी जीन असलेल्या वाणावर अधिक आहे. तर शासनाने तुलसी कंपनीचे बीटी कापूस वाण, कबड्डी, पंगा, राशी कंपनीचे राशी 659 तसेच इतर सर्व कंपन्यांच्या सर्व प्रकारच्या बीजी-2 कापूस बियाण्याच्या पाकिटाची कमाल किरकोळ विक्री किंमत 853 रुपये इतकी ठरवलेली आहे. मात्र असे असताना काही कृषी सेवा केंद्र चालक हे शेतकऱ्यांना वाढीव दर सांगत आहे. त्यामुळे कृषी विभागाने कारवाई धडाका लावला आहे.
यांचे परवाने केले निलंबित…
वाढीव दराने बियाणे विकले जात असल्याची माहिती मिळताच कृषी विभागाने त्याची दखल घेऊन संबंधित व इतर कृषी सेवा केंद्राची तपासणी केली. या तपासणी अहवातलात त्रुटी आढळून आल्याने परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी एकूण पाच दुकानांचे परवाने निलंबित केले आहे. ज्यात मंगलमूर्ती कृषी केंद्र हिंगोली, गजानन कृषी केंद्र हिंगोली, अनुसया ट्रेडर्स शिरड शहापूर, किसन ॲग्रो सर्विसेस ॲन्ड इरिगेशन शिरड शहापूर, स्वामी सुखदेवानंद कृषी सेवा केंद्र हिंगोली यांचे बियाणे विक्री परवाने निलंबित केले आहेत.
इथे करा तक्रार….
तसेच शेतकऱ्यांनी कापूस बियाणे, इतर निविष्ठा (खते, किटकनाशके इ.) एमआरपीपेक्षा जास्त दराने खरेदी करु नये. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी निविष्ठांच्या गुणवत्ता, उपलब्धतेबाबत काही अडचण, तक्रार असल्यास तात्काळ कृषी विभाग पंचायत समिती औंढा नागनाथ (मो. 8087889299), कृषी विभाग पंचायत समिती वसमत (मो. 9028905357), कृषी विभाग पंचायत समिती कळमनुरी (मो. 7038473903), कृषी विभाग पंचायत समिती सेनगाव (मो. 9158121718), कृषी विभाग पंचायत समिती हिंगोली या कृषी विभागाच्या तक्रार नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी उत्तम वाघमारे यांनी केले आहे.