गानकोकिळा लता दीदींचं शिक्षण किती झालं होतं? त्यांच्या संमधी थोडस !तुम्हाला माहीत आहे काय?
भारतरत्न, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, लतादीदी आज आपल्यात नसल्या तरी त्यांचा स्वर मात्र भारतीयांच्या मनात कायम अजरामर राहील. 28 सप्टेंबर 1929 रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या लता मंगेशकर यांनी वयाच्या पाचव्या वर्षी संगीत शिकण्यास सुरुवात केली.
भारतरत्न पुरस्काराने सन्मानित लता दीदींनी 1942 साली आपल्या करिअरची सुरुवात केली. महल चित्रपटातील ‘आयेगा आने वाला’ या गाण्याने त्यांना खरी ओळख मिळाली. लता मंगेशकर यांनी जगभरातील 36 भाषांमध्ये 50 हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. पण आपल्या स्वरांनी कोट्यवधी रसिकांना भुरळ पडणाऱ्या अशा लतादीदींचं शिक्षण किती झालं होतं तुम्हाला माहितीये का? आज जाणून घेउया काही खास गोष्टी.
भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांचा जन्म मध्य प्रदेशमधील इंदूर या शहरात झाला होता. त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांचं घर फक्त एक खोलीचं होतं. त्यांचं हे घर इंदूरमधील एका शीख गल्लीत होतं. महत्वाचं म्हणजे आज त्याठिकाणी एक कापड दुकान चालवलं जात आहे. त्या दुकानाचं नाव मेहता क्लॉथ सेंटर असं आहे. या दुकानात नेहमीच दीदींची सुपरहिट गाणी लावलेली असतात. तसेच या ठिकाणी इंदूर प्रशासनाने दीदींचा पोर्ट्रेट लावण्याचा आदेश देखील दिला होता. मेहता स्टोअरमध्ये लता दीदींचे अनेक फोटो लावण्यात आले आहेत.
लता दीदींबाबत या गोष्टी माहिती आहेत का?
गानकोकिळा लता मंगेशकर यांचं खरं नाव हेमा असं होतं. परंतु एका नाटकाने प्रभावित होऊन त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर यांनी त्यांचं नाव बदलून लता मंगेशकर असं ठेवलं. आज कोट्यवधींची संपत्ती असणाऱ्या लतादीदी कधीकाळी एका खोलीत राहात होत्या.
लता मंगेशकर यांनी वयाच्या पाचव्या वर्षीच गायला सुरुवात केली होती. त्यांच्या शिक्षणाबद्दल सांगायचं तर लता मंगेशकर या फक्त एकच दिवस शाळेत गेल्या होत्या. असं म्हटलं जातं की त्यांना आपली बहीण आशा यांनासुद्धा आपल्या सोबत शाळेत घेऊन जायचं होतं परंतु यासाठी परवानगी न मिळाल्यानं त्यांनी शाळेला रामराम केला. काही रिपोर्टनुसार लता दीदींना शाळेतील विद्यार्थींना गाणी शिकवायची होती परंतु शिक्षिकेकडून याला विरोध झाल्याने त्यांनी परत कधीच शाळेची पायरी चढली नाही, असंही म्हटलं जातं. पण लतादीदी कधीच शाळेत गेल्या नसल्या तरी त्यांच्याकडे 6 पदव्या होत्या. पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, बडोदा विद्यापीठासोबत न्यूयॉर्क युनिव्हर्सिट यांसारख्या नामांकित विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केलं होतं.
लता मंगेशकर यांच्या वडिलांचं म्हणजेच मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचं अकालीच निधन झालं. त्यामुळे अवघ्या 14 व्या वर्षी त्यांच्यावर घरातील सर्व भावंडांची जबाबदारी आली. त्यानंतर लतादीदींनी गाणं गात आपल्या भावंडांचा सांभाळ केला.
लता दीदींना 8 जानेवारी रोजी कोरोनाची लागण झाली होती. वय जास्त असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर ६ फेब्रुवारी रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. आज लतादीदी हे जग सोडून गेल्या असल्या तरी त्यांच्या स्वराने मात्र त्या अनेक शतके जिवंत राहतील यात शंका नाही.