ऑस्ट्रेलियामध्ये 2015 साली आयटीमध्ये काम करणाऱ्या भारतीय महिलेची हत्या झाली होती. भररस्त्यात एका अज्ञात मारेकऱ्यानं महिलेला भोसकलं होतं, प्रथम ही एखाद्या माथेफिरूनं केलेली हत्या असावी,असा ऑस्ट्रेलियन पोलिसांचा अंदाज होता.
मात्र या घटनेनं आता वेगळंच वळण घेतलंय. तो ठरवून केलेला खून असल्याचा संशय पोलिसांना आहे आणि त्याकरताच आता पोलिसांनी हत्येबाबत माहिती देणाऱ्या व्यक्तीच्या बक्षीसाच्या रकमेत वाढ करुन ते एक मिलियन डॉलर म्हणजे सुमारे आठ कोटी रुपये केलं आहे.
मूळ बंगळुरूमधील असलेली 41 वर्षीय प्रभा अरुण कुमार या विवाहित महिलेचा ऑस्ट्रेलियात 2015 मध्ये खून झाला होता. आयटी कंपनीत काम करणारी प्रभा सात मार्च 2015 रोजी रात्री 9.30 वाजता रस्त्यावरून घराकडे निघाली होती. ती भारतात असलेल्या नवऱ्याशी फोनवरून बोलत होती. इतक्यात हेल्लेखोराने तिला भोसकलं. नवऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, तिच्या विव्हळण्याचा आणि मदतीसाठी आरडाओरडा करण्याचा आवाज त्याने फोनवरून ऐकला होता. तुला हवं तर सगळ्या मौल्यवान वस्तू घे; पण मला मारू नकोस अशी गयावया ही प्रभाने केल्याचं ऐकलं होतं, असंही नवर्याने पोलिसांना सांगितलं. मात्र हल्लेखोरानं तिला मारलं.
प्रभा आयटीमध्ये काम करत होती. नवरा आणि नातेवाईकांपासून लांब असल्याचा तिला त्रास होत होता. त्यामुळेच ती भारतात परतण्याविषयी विचार करत होती, अशी माहिती एबीसीनं दिली आहे. ही घटना घडून इतकी वर्षं होऊनही मारेकऱ्याला शोधण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. घटनेचा तपास करण्याकरता ऑस्ट्रेलियन पोलिसांनी विशेष पथक स्थापन केलं. तसंच नागरिकांनाही माहिती देण्याचं आवाहन वेळोवेळी करण्यात आलं, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही.
हा हल्ला एखाद्या माथेफिरूनं केलेला असावा असा पोलिसांचा सुरुवातीला अंदाज होता. मात्र प्रभा यांच्यावरचा तो हल्ला ठरवून केलेला होता, असं प्रभा यांच्या स्मरणाप्रीत्यर्थ पेरामट्टा पार्क इथं सोमवारी आयोजित केलेल्या ‘प्रभा मेमोरियल वॉक’ या कार्यक्रमावेळी डिटेक्टिव्ह सुप्रिटेंडंट डॅनी दोहर्टी यांनी सांगितलं. या हत्येमागे चोरी किंवा लैंगिक छळ यापैकी एखादा हेतू असण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली.
प्रभा यांची हत्या झाली तेव्हा तिच्या नवऱ्याला एक गर्लफ्रेंड होती, याचे पुरावे मिळालेले आहेत. त्यामुळे या हत्येमध्ये त्याचे हितसंबंध गुंतलेले असू शकतात. मात्र त्याच्याबरोबरच आणखीही अनेकांची चौकशी करण्यात आलेली आहे, अशी माहिती एबीसीनं दिली आहे. प्रभा यांच्या नवऱ्यानं मात्र हत्याप्रकरणात हात असल्याचे सगळे आरोप याआधीच फेटाळून लावले आहेत.
या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी आता न्यू साउथ वेल्स (NSW) पोलिसांनी हत्येची माहिती देणाऱ्याला एक मिलियन डॉलर (आठ कोटी रुपयांहून अधिक) रक्कम बक्षीस देणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्या प्रकरणाबाबत माहिती देण्याचं आवाहन पुन्हा एकदा सरकार व पोलिसांतर्फे करण्यात आलं आहे. त्याकरता आठ कोटी रुपयांचं बक्षीसही मिळणार आहे. प्रभा यांचे अनेक नातेवाईक भारतात राहत असल्यामुळे ही बक्षिसाची रक्कम भारतीयांनाही मिळू शकते, असंही पोलिसांनी सांगितलं आहे.