क्राईम

७ कोटीचं सोनं, बेपत्ता पत्नी, पतीचा सापडला मृतदेह; अखेरच्या सेल्फीमागची धक्कादायक कहाणी काय ?


एक सुंदर पत्नी, २ लहान मुले आणि चांगला चाललेला सराफा व्यवसाय, उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे राहणाऱ्या व्यावसायिक सौरभ बब्बरकडे सर्वकाही होते. धार्मिक स्वभावाचे असलेले सौरभ श्री साई परिवार समिती नावाची संस्थाही चालवायचे.

गरीब मुलींचे लग्न लावणे, अनाथ मुलांच्या शिक्षणाचा खर्च, वृद्धांसाठी आश्रम, उपचारासाठी मोफत व्यवस्था अशा विविध सामाजिक कार्यक्रमात सौरभ नेहमी अग्रेसर राहायचे. प्रत्येक मंगळवारी त्यांचं कुटुंब भंडाराही करायचे मग अचानक असं काय घडलं ज्यामुळे त्यांनी सर्व मागे सोडून मृत्यूला कवटाळायचा निर्णय घेतला? हा प्रश्न उभा राहिला आहे.

सौरभ बब्बर आणि त्यांची पत्नी मोना बब्बर यांच्या आत्महत्येने सर्वच हैराण आहेत. हे दोघे इतका टोकाचा निर्णय घेतील याची कल्पनाही कुणी केली नव्हती. सौरभ आणि मोना १० ऑगस्टला बाईकने हरिद्वारला पोहचले. त्याठिकाणी अखेरचा सेल्फी घेत सुसाईड नोटसह तो मित्राला पाठवला आणि त्यानंतर दोघांनी गंगा नदीत उडी मारली. सौरभचा मृतदेह नदीत सापडला मात्र मोनाबाबत अद्याप काहीच थांगपत्ता नाही. या दोघांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं म्हटलं होते. दोघांनी त्यांच्या मुलांची जबाबदारी आजी आजोबाकडे सोपवत संपत्ती मुलांच्या नावे केली.

आत्महत्येमागे १० कोटी कर्जाची कहाणी

सौरभ आणि मोना यांच्या आत्महत्येमागे जे कारण समोर आलं आहे त्यामागे १० कोटी रुपयांच्या कर्जाची कहाणी आहे. सौरभ सहारनपूरमध्ये गोल्ड किटी सेविंग नावाची एक कमिटी चालवत होते. या कमिटीच्या माध्यामातून ते लोकांकडून पैसे गुंतवणूक करून घ्यायचे आणि कमिटीकडून त्याबदल्यात एका निर्धारित वेळेत ज्वेलरी म्हणून सोने द्यायचे. सौरभ खूप वर्ष ते काम करत होते. त्यामुळे त्यांच्या कमिटीतील सदस्यांची संख्या वाढत होती.

७ कोटी रक्कम अन् व्यवसायी कनेक्शन

सौरभनं त्याच्या गोल्ड कमिटीतील १०० लोकांना सोने देण्यासाठी सहारनपूर इथल्या एका व्यावसायिकाकडून ७ कोटी रुपयांचे सोने बुक केले होते. सौरभच्या या कमिटीचं १० ऑगस्टला फायनल करून ११ ऑगस्टला सर्व सदस्यांना हिशोब करण्यासाठी बोलावले होते. परंतु काही दिवसांपूर्वी ज्या व्यावसायिकाला ७ कोटी दिले त्याच्या मुलाने ते पैसे घेऊन दुबईला निघून गेला. सौरभने संबंधित व्यावसायिकाकडून ती रक्कम मागितली परंतु ते मिळवण्यात त्याला यश आलं नाही. सौरभवर आधीच ३ कोटीचे कर्ज होते. त्यात या ७ कोटींमुळे त्याच्यावर दबाव वाढला.

नोकराला दिली दुकानाची चावी

कर्जाच्या जाचाला कंटाळून सौरभ आणि मोनानं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. १० ऑगस्टला सौरभ आई वडिलांकडे गेला त्याठिकाणी सर्वकाही ठीक होईल असं सांगितले. त्याने नोकराकडे दुकानाची चावी दिली आणि उद्या सकाळी दुकान उघड असं सांगितले. त्यानंतर सौरभ मुलांना घेऊन त्याच्या सासरी गेला तिथे आजी आजोबांकडे मुलांना सोडले. त्यानंतर मोनासोबत तो हरिद्वारला पोहचला. रात्रीच्या अंधारात दोघांनी हात पकडून नदीत उडी मारली. त्यात सौरभचा मृतदेह सापडला परंतु मोनाचा मृतदेह अद्याप सापडला नाही.

 

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *