मुलीला फूस लावून पळवून नेल्याने बापाला राग अनावर झाला. त्याने आपल्या मित्रांसोबत तरुणाचं घर गाठलं. घरी एकट्या असलेल्या त्याच्या बहिणीला मारहाण करत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
इतकंच नाही, तर या घटनेचं आरोपींनी मोबाइलमध्ये चित्रिकरणही केलं. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीसह त्याच्या इतर साथीदारांना बेड्या ठोकल्या आहेत.
तळपायाची आग मस्तकात जाईल अशी ही संतापजनक घटना हरियाणाच्या लुधियाना जिल्ह्यात घडली. या घटनेनं परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे. रविंदर सिंह, विरेंदर सिंह, अमन सिंह आणि संतोष सिंह अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना कोर्टात हजर केलं असता न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे.
लुधियाना जिल्ह्यात राहणाऱ्या आरोपी रविंदर सिंहच्या मुलीचे पीडित तरुणीच्या भावासोबत प्रेमसंबंध होते. याची कुणकुण रविंदर सिंह आणि त्याच्या कुटुंबियांना लागली होती. त्याने मुलीला मारहाण करत संबंधित तरुणाला भेटायचे नाही, असा सज्जड दम दिला.
तरीही प्रेमापोटी मुलीने त्याचे काहीच ऐकले नाही. रविंदर सिंहची मुलगी त्या तरुणासोबत पळून गेली. यावरून आरोपीला राग अनावर झाला. गावात आपली बदनामी झाली आता याचा वचपा मी काढणार, असं रविंदर सिंह वारंवार सांगत होता. दरम्यान, तरुणाची बहिण घरात एकटीच असल्याचं आरोपी रविंदर सिंहला कळालं.
त्याने आपल्या नातेवाईकांना घेऊन थेट तरुणाचं घर गाठलं. तिथे असलेल्या तरुणाच्या बहिणीला आरोपींनी मारहाण केली. इतकंच नाही, तर तिच्यावर आळीपाळीने बलात्कार देखील केला. संतापजनक बाब म्हणजे, चारही आरोपींनी बलात्कार करतानाचे व्हिडीओ देखील काढले.
या भयानक घटनेनंतर पीडित तरुणी मानसिक तणावात गेली. पोलिसांच्या माहितीनुसार, काही दिवस तिची वाचा गेली होती. त्यामुळे ती घडलेल्या प्रकाराबाबत कुणालाही सांगू शकली नाही. दरम्यान, कुटुंबियांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता, तिच्यावर बलात्कार झाल्याचं समोर आलं.
उपचारानंतर आता तरुणी बोलू लागली असून तिने पोलिसांना जाब दिला आहे. रविंदर सिंह आणि त्याच्या भावाने आपल्यावर आळीपाळीने बलात्कार केल्याचं पीडित तरुणीने पोलिसांना सांगितलंय. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून त्यांचा चांगलाच समाचार घेण्यात येतोय.