Crime News : अनेक जणींना फसवून लग्न करणारा आणि पुन्हा तो मी नव्हेच, असे टोपी फिरवत म्हणणारा आचार्य अत्रे यांचा ‘लखोबा लोखंडे’ अजरामर आहे! तो सध्या मराठी रंगभूमीवर वावरत नसला तरी पालघरच्या नालासोपारात तो अवतरला.
या नव्या ‘लखोबा’ने एक-दोन नव्हे, तर तब्बल 25 वेळा लग्न केले आणि या सर्व पत्नींना अक्षरशः लाखो रुपयांना गंडवले. यातील एक लग्नाची बेडी मात्र गजाआड होण्यास कारणीभूत ठरली. फिरोज नियाज शेख (वय 43) नावाचा हा लुटारू ‘लखोबा’ हाती लागला आहे.
फिरोज नियाज शेख याने 2015 मध्ये पुण्यातील चार महिलांना हेरून असेच लग्न केले. त्यानंतर तो 2023 मध्ये 6 वेळा तुरुंगात जाऊन आला. मात्र त्यानंतरही त्याने फसवणूक सुरू ठेवत तब्बल २५ महिलांशी लग्न केले व त्यांच्या भावी साथीदाराबद्दलचे स्वप्न धुळीस मिळवले.
लागताच बेड्या ठोकून पोलिसांनी त्याची वरातच काढली. फिरोज नियाज शेखने एका लग्न जमवणाऱ्या संकेतस्थळावरून एका महिलेशी ओळख वाढवली. तिच्याशी लग्न केले. त्यानंतर तिच्याकडून लॅपटॉप व कार घेण्यासाठी 6 लाख 50 हजार 790 रुपये घेऊन तो मग पसार झाला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर या महिलेने नालासोपारा पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी फिरोजचा शोध सुरू केला. मात्र त्याचा नंबर नसल्याने पोलिसांना सापडत नव्हता. पोलिसांनी एक फेक महिलेची प्रोफाईल बनवून महिलेला भेटायला भेटायला बोलावले. तो कल्याणमध्ये असल्याची माहिती मिळताच नालासोपारा पोलिसांनी सापळा रचून त्याला जेरबंद केले.
फिरोजकडून 3 लाख 21 हजार 490 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यात अनेक महिलांचे एटीएम कार्ड, चेकबुक, 6 मोबाईल, 1 लॅपटॉप, महिलांचे पॅन कार्ड, क्रेडिट कार्ड, सोने-चांदीचे दागिने यांचा समावेश आहे. या मुद्देमालावरूनच फिरोजने किती जणींना गंडवले याचा अंदाज पोलिसांना आला.
हा तर ‘लखोबा लोखंडे’च फिरोजने अशाप्रकारे 25 घटस्फोटित आणि विधवा महिलांची फसवणूक करत लग्न केल्याची धक्कादायक माहिती मग तपासात समोर आली. मॅट्रिमोनियल संकेतस्थळावरून तो घटस्फोटित आणि विधवा महिलांना हेरत असे. त्यांच्याशी ओळख वाढवून लग्नाचा प्रस्ताव द्यायचा. जमले तर लग्न करून मोकळा व्हायचा. त्या महिलेचे सर्व सोने-चांदीचे दागिने आणि पैसे घेऊन पसार व्हायचा. हीच त्याची गुन्हा करण्याची पद्धत होती. त्याच्याविरोधात आतापर्यंत फसगत झालेल्या महिलांपैकी कुणीही पोलिसांत तक्रार दिली नव्हती. बदनामीची भीती आणि समाजात आयुष्य एकाकी काढण्याचे आव्हान यामुळे ही फसगत या महिलांनी गुमान सहन केली असावी. मात्र, नालासोपाऱ्यातील महिलेने धाडस दाखवले आणि हा लखोबा चतुर्भुज झाला. त्याला वसई न्यायालयात हजर केल्यावर दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोटभरण्याचे साधन लग्न
फरोज नियाज शेख हा 12 वी पर्यंत शिक्षण घेतले असून नोकरी धंदा काही न करता महिलांशी तोतयेगीरी करत फसवणूक करून त्यांच्याच पैशांवर मजा मारत होता. पोटभरण्याचे साधन म्हणूनच त्याने प्रत्येक लग्न केले.
विशेष म्हणजे त्याने कोणत्या गुन्ह्यात कोणती कलमे लावतात याची माहिती त्याने घेतली होती. आपली तक्रार होऊ नये याची तो काळजी घेत होता. त्याच्या नावावर एकही मोबाईल नव्हता त्याने फजगत केलेल्या महिलांचे फोन घेऊन इतर महिलांशी बोलत होता. त्याच नंबर वरून तो प्रोफाइल सुद्धा क्रिएट करत होता. याच्यासोबत एक महिला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.