क्राईम

उसाच्या शेतात बाळाला जन्म देऊन आई फरार


बाळाला जन्म देऊन त्याची आई फरार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले,अन् त्यांनी बालकाला बजाजनगर येथील एका हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.

गंगापूर : गंगापूर तालुक्यातील एकलेहरा येथील उसाच्या शेतात बाळाला जन्म देऊन निर्दयी आई फरार झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास उघडकीस आली. पुरूष जातीचे अर्भक जखमी अवस्थेत शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना आढळून आले. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे फौजदार संदीप शिंदे, गणेश गिरी, महिला पोलीस कर्मचारी संगीता वैद्य यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत नवजात बालकाला सुरक्षितपणे बजाजनगर येथील एका हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.

पोलिसांनी घेतली घटनास्थळी धाव : एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या एकलेहरा येथील अनिल शिंदे यांच्या मालकीच्या शेतामध्ये नवजात अर्भक रडत असल्याचा आवाज शेजारील शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना आला. ही माहिती शेतमालक अनिल शिंदे यांना देण्यात आली. अनिलनं पुढं होऊन पाहणी केली असता, एका सिमेंटच्या टाकाऊ गोणीच्या पोत्यावर नुकतंच जन्मलेले अर्भक त्याला दिसलं. अनिल यांनी तत्काळ ही माहिती एमआयडीसी वाळूज पोलिसांना दिली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अर्भकाला पोलीस व्हॅन मधून बजाजनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले.

पोलीस बनले पालक : घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. नवजात बाळाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असता बाळाच्या गळ्यावर, पायावर आणि डाव्या हाताच्या मनगटावर किरकोळ जखमा असल्याचं आढळून आलं.पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांनी बाळासाठी दोन जोडे ड्रेस, पांघरून, दूध आणि औषधी खरेदी केली. दूध पाजताच बाळ शांत झालं. यावेळी खाकी वर्दीच्या आतील माणुसकी पाहून रुग्णालयातील नागरिक आवक झाले.

ऊसाच्या शेतालगतच महिलेची प्रसूती : पोलिसांनी परिसराची बारकाईनं पाहणी केली असता ज्या ठिकाणी बाळ आढळून आलं त्या ठिकाणापासून अवघ्या काही अंतरावर रक्त सांडल्याचं दिसलं. त्यावरूनच पोलिसांनी सदरील मातेची या ठिकाणी प्रसूती झाली असावी असा अंदाज वर्तविला आहे. तुर्तास सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येनार आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *