पती-पत्नीमधील वाद कधी कधी टोक गाठतात तर कधी दोघांमध्ये निर्माण झालेल्या गैरसमजातून भयानक घटनाही घडू शकतात. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमधील हमरापूर जिल्ह्यात घडली आहे.
एका महिलेने गळफास घेत आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण ऐकून कुटुंबीयांच्या पायाखालची जमिनच हादरली आहे. महिलेच्या आत्महत्या प्रकरणी पोलिस पुढील कारवाई करत आहेत.
रचना असं आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून जवळपास 9 वर्षांपूर्वी हरिप्रसाद अनुरागी याच्यासोबत तिचे लग्न झाले होते. लग्नानंतर सर्व काही व्यवस्थित सुरू होते. मात्र, एक दिवशी अचानक रचनाला तिच्या पतीच्या खिशात एका महिलेचा फोटो सापडला. या कारणावरुन दोघांत खूप वाद झाले. त्याच रागातून तिने गळफास घेत आत्महत्या केली आहे. महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.
हरिप्रसाद याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यात गैरसमज निर्माण झाले होते. त्यातूनच तिने टोकाचा निर्णय घेतला होता. तसंच, त्याच्या खिशात महिलेचा फोटो कसा आला, याबाबतही त्याने स्पष्ट केले आहे. काही दिवसांपूर्वी तो मित्रासोबत बाहेर गेला होता. त्याचवेळी त्याच्या एका मित्राने एका महिलेचा फोटो खिशातून काढला व रस्त्यावर फेकला. मात्र, हरिप्रसाद याने त्याला यावरुन हटकले. तसंच, रस्त्यावर अशाप्रकार फोटो फेकू नको, असं सांगितले. मात्र तरीही त्याने एकलं नाही. शेवटी नाईलाजाने मी महिलेचा फोटो उचलून खिशात ठेवला आणि घरी निघून आलो. पण नंतर मात्र त्याबद्दल मी साफ विसरुन गेलो, असं हरिप्रसाद यांने पोलिसांना सांगितलं आहे.
हरिप्रसाद याने पुढे सांगितलं की, रचना कपडे धुत असताना तिला माझ्या खिशात महिलेचा फोटो सापडला. त्यावर तिने माझ्यासोबत वाद घालायला सुरुवात केली. पण मी सगळं समजावून सांगीतले तरीदेखील तिने ऐकलं नाही. त्यामुळं आमच्यात खूप वाद झाले. त्यामुळं मी वैतागून घरातून निघून गेलो.
मी घरातून निघून गेल्यावर रचना आतल्या खोलीत गेली आणि दरवाजा बंद केला. माझी आई बाहेरच्या खोलीतच बसली होती. आत गेल्यावर रचनाने गळफास घेत आत्महत्या केली. मला जेव्हा घटनेची माहिती मिळाली तेव्हा मी तातडीने घरी पोहोचलो व तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले होते, असं हरिप्रसाद याने पुढे नमूद केलं आहे. हरिप्रसाद आणि रचना दोघांना तीन मुलं असून एक मुलगी आणि दोन मुलं आहेत.