क्राईम

भावाने भावाची हत्या घडवून आणत मालमत्ता वादाचा सूड


मुंबई : मालमत्तेच्या हव्यासापोटी रक्ताच्या नात्याला रक्तरंजित स्वरूप येत आहे. मुंबईत नुकत्याच उघडकीस आलेल्या अशाच एका घटनेत भावाने भावाची हत्या घडवून आणत मालमत्ता वादाचा सूड उगवला.

हा कट यशस्वी करण्यासाठी त्याने कॉन्ट्रॅक्ट किलरची मदत घेतल्याचे समोर आले आहे. इरफान नमकवाला या आरोपीने सख्खा भाऊ इम्रानच्या हत्येचा कट रचला. याप्रकरणात मुंबई पोलिसांनी 40 वर्षीय इरफान नमकवाला याच्यासह इस्लाम कुरेशी, सलीम शेख आणि लोकेंद्र रावत या नेपाळमधील कॉन्ट्रॅक्ट किलर्सना अटक केली आहे. पोलिसांनी काही दिवसांतच हत्येचा उलगडा करण्यात यश मिळवले आहे.

मित्रासोबत कारने जात असताना इम्रानवर हल्ला

इम्रान नमकवाला हा त्याचा मित्र तारिक रेशमवाला याच्यासोबत मुंबईतील रीगल सिनेमाच्या दिशेने जात होता. यावेळी कारच्या टायरमधील हवा कमी झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे ते दोघे खाली उतरून कारच्या टायरमधील हवा तपासत होते. याचदरम्यान दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी इम्रानवर जीवघेणा हल्ला केला. त्यात रक्तबंबाळ झालेल्या इम्रानचा काही वेळात मृत्यू झाला. इम्रानच्या चेहऱ्याला, हाताला आणि पायाला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली. हल्ला करुन हल्लेखोरांनी धूम ठोकली होती. हल्ल्याच्या घटनेनंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली.

पोलिसांनी कसून तपास करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या

अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे होते. हल्लेखोरांना पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष मोहिम हाती घेतली होती. या मोहिमेत पोलिसांनी अनेक सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केले. त्यानंतर कुरेशी आणि शेख या दोन हल्लेखोरांना शिवडी येथील झोपडपट्टी परिसरातून अटक करण्यात आली. तसेच नेपाळमधील नामचीन कॉन्ट्रॅक्ट किलर रावतला आठवड्याभरानंतर विरार परिसरातून अटक करण्यात आली. रावतचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. पोलिसांनी मोठ्या चलाखीने त्याच्यापर्यंत पोचण्यात यश मिळवले.

भोईवाडा, साकी नाका, कामोठे आणि शिवाजी नगर पोलीस ठाण्यांमध्ये हत्या आणि हत्येचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये तो ‘वॉण्टेड आरोपी’ आहे. वडाळा आणि अँटॉप हिल पोलिसांनी त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केलेले आहे. दरम्यान, चारही आरोपींविरुद्ध हत्येचा प्रयत्न प्रयत्न, गुन्हेगारी कट रचणे, शांतता भंग करण्यासाठी चिथावणी देणे आणि सामान्य हेतू या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *