महिला पोलिसांनीच टाकल्या धाडी आणि गाजविली अवैध दारू कारवाई
छत्रपती संभाजीनगर : छावणी पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांनी एक वेगळाच प्रयोग करताना महिला अंमलदारांची पथके तयार केली आणि अवैध दारू विक्री धंद्यावर एकाच वेळेस धाडी टाकण्याच्या सूचना केल्या.
महिला अंमलदारांनी धाडी टाकून केवळ अर्ध्या ते पाऊस तासात चौघांना ताब्यात घेऊन दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. विशेष म्हणजे ‘आम्हालाही आमचे कौशल्य दाखविण्याची संधी मिळाल्याची’ भावना महिला अंमलदारांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.
याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यातील विशेष पथकाचे उपनिरीक्षक पुंडलिक डाके यांना भीमनगर, भावसिंगपुऱ्यात अवैध दारूविक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून निरीक्षक कैलास देशमाने यांच्या सूचनेनुसार अवैध दारूविक्रीच्या धंद्यावर छापा मारण्यासाठी महिला पोलिस अंमलदारांचे चार पथक नेमण्यात आले.
यानंतर पथक एकमधील मीना जाधव, अरुणा वाघेरे या महिला अंमलदारांनी भावसिंगपुऱ्यातील मनोज रामभाऊ राऊत (वय ३४) याच्या घरात छापा मारत २ हजार ९४० रुपयांच्या देशी दारूचा साठा जप्त केला. तर पथक दोनमधील महिला अंमलदार सुमन पवार, सविता लोंढे यांनी भीमनगरातील आकाश प्रकाश अवसरमोल (३०) याच्या घरात छापा मारुन त्याच्या ताब्यातून दोन हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पथक क्र. तीनमध्ये विशेष पथकाचे उपनिरीक्षक पुंडलिक डाके यांच्यासह वैशाली चव्हाण यांचा समावेश होता.
यांनी आशिष रणजित खरात (२४, रा. तांबे गल्ली, भीमनगर भावसिंगपुरा) याच्या घरात छापा मारत एक हजार ६२५ रुपये किमतीची विदेशी दारू जप्त केली. पथक चारच्या अंमलदार ज्योती भोरे, अंमलदार प्रियंका बडुगे यांच्या पथकाने रोहित कल्लू शिर्के (२८, गल्ली क्र. एक, भीमनगर भावसिंगपुरा) याच्या घरात छापा मारत दोन हजार ६६० रुपये किमतीची देशी दारू जप्त केली. दरम्यान, यावेळी महिला पथकासाठी एक पुरुष उपनिरीक्षक सोबत देण्यात आला होता.