अतिक्रमण विभागाची कारवाईला सुरुवात, बैठ्या चाळींच्या अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा. बेकायदेशीर रित्या काम सुरू ठेवल्यास कायदेशीर गुन्हा दाखल.
नागरिकांच्या वाढत्या तक्रारींमुळे पालिकेच्या अतिक्रमण विभागाने ऐरोलीतील बैठ्या चाळीमध्ये सुरु असलेली अनधिकृत बांधकामे पूर्णपणे बंद केली आहेत. तसेच बेकायदेशीररीत्या पुन्हा काम सुरु केल्यास कायदेशीर गुन्हा नोंद करण्यात येणार असून लवकरच मोठी कारवाई होणार असल्याचे ऐरोली जी विभाग सहा.आयुक्त महेंद्र सप्रे यांनी सांगितले होते.
याबाबत प्रसार माध्यमांनी बातमी प्रसारित केली होती. याच बातमीचा परिणाम म्हणून गुरुवारी ऐरोली अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून ऐरोलसेक्टर २ मधील ए विभागात नोटीस देऊनही सुरु असलेल्या बैठ्या चाळींच्या अनधिकृत बांधकामांवर मोठी कारवाई करण्यात आली. यावेळी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे जी विभाग अतिक्रमण अधिकारी मयुरेश पवार यांनी सांगितले.
या कारवाई दरम्यान ४ ब्रेकर, गॅस कटर सह जी विभाग अतिक्रमण अधिकारी मयुरेश पवार, कार्यालय अधीक्षक महेश नाईक, लिपिक विष्णू शिंगळे, १० सुरक्षा रक्षक व लेबर उपस्थित होते. या मोठ्या कारवाईमुळे ऐरोलीतील बैठ्या चाळींच्या अनधिकृत बांधकामांन लगाम लागणार आहे.