अवैध वाळू नेणाऱ्या वाहनमालकांची मालमत्ता जप्त करणार; जिल्हाधिकारी अमन मित्तल
जिल्ह्यात वाळूचोरीवर नियंत्रण आणण्यासाठी दैनंदिन कारवाई केली जात आहे. असे असतानाही वाळूचोरी थांबत नाही. मात्र, आता जिल्हा प्रशासनाने ‘एक घाव, दोन तुकडे’, असाच निर्णय घेतला आहे.
अवैध वाळूचे वाहन जप्त केल्यावर दंड न भरल्यास संबंधित वाहनमालकाची मालमत्ताच जप्त करण्याची कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी शुक्रवारी (ता. १६) पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी मित्तल म्हणाले, की काही दिवसांपासून वाळूच्या अवैध वाहतूक प्रकरणी महसूलचे पथक कारवाई करीत आहे. या कारवाईत वाहन जप्त केले जात असून, त्यांना दंड आकारण्यात येतो.
मात्र, असे लक्षात आले आहे, की वाहन जप्त केल्यावर ते सोडविण्यासाठी दंडही भरला जात नाही. त्यामुळे अशी वाहने जप्तीच्या ठिकाणी पडून राहतात. परिणामी, दंडही वसूल होत नाही. आता मात्र त्यावरही प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.
वाळूचे वाहन जप्त केल्यानंतर दंड न भरल्यास संबंधित वाहनमालकाला मालमत्ता जप्तीची नोटीस दिली जाईल. या नोटिशीनंतरही त्याने दंड भरला नाही, तर त्याच्या मालमत्तेवर बोजे बसवून ती शासन जमा केली जाईल.
रावेर येथील मोहन बोरसे नावाच्या वाहनमालकाला अशाच आशयाची नोटीस बजावली असून, त्याने दंड न भरल्याने त्याच्या मालमत्तांवर बोजे बसविण्याची कार्यवाही केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
शासन आपल्या दारी’ २७ ला
‘शासन आपल्या दारी’ हा व्यापक स्वरूपाचा कार्यक्रम २७ ला होणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मित्तल यांनी दिली. या कार्यक्रमात लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ जागेवरच दिला जाणार आहे. त्यासाठी अडीच लाख लाभार्थ्यांची निवड केली आहे. कार्यक्रमाला किमान ७० ते ७५ हजार लाभार्थी बोलावण्यात येणार आहेत. याच कार्यक्रमात आरोग्य तपासणी आणि रोजगार मेळावाही होणार आहे.
सर्वसामान्यांसाठी हेल्पलाइनचा उपक्रम
जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय कामांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात यावे लागते. मात्र, येत्या काही दिवसांत सर्वसामान्यांसाठी हेल्पलाइन क्रमांक जाहीर केला जाणार आहे. नागरिकांनी त्यांची कामे या क्रमांकावर सांगून त्यांना सायंकाळपर्यंत उचित एसएमएस दिला जाणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
दोन महिने पुरेल एवढा पाणीसाठा
जिल्ह्यात अद्याप वरुणराजाचे आगमन झालेले नाही. साधारणत: पुढील आठवड्यात १८ ते २२ जूनदरम्यान पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे. असे असले, तरी जिल्ह्यातील धरणांमध्ये दोन महिने पुरेल एवढा साठा असल्याचेही जिल्हाधिकारी मित्तल यांनी सांगितले.