बनावट देयकांच्या आधारे लाटली ६९ लाखांची रक्कम, ग्रामविकास अधिकाऱ्यांसह दोन माजी सरपंचांचा प्रताप
लाखांदूर (भंडारा) : पाच वर्षांच्या कालावधीत शासनाच्या विविध योजनांमधून ग्रामपंचायतीला प्राप्त निधीअंतर्गत विकास कामातील साहित्य खरेदीचे बनावट देयके लावून शासनाच्या तब्बल ६८ लाख ९६ हजार रुपयांच्या निधीचा अपहार करण्यात आला. ही बाब आरोपानंतर केलेल्या लेखा परीक्षण अहवालातून स्पष्ट झाली. याप्रकरणी लाखांदूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मार्तंड खुणे यांच्या तक्रारीवरून लाखांदूर पोलिसांनी चप्राड ग्रामपंचायतीचे तत्कालीन दोन सरपंचांसह दोन ग्रामविकास आधिकाऱ्यांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
यात चप्राड ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच धनराज गोपीनाथ ढोरे (४७) व कुसुम जयपाल दिघोरे (४२) यासह तत्कालीन ग्रामविकास अधिकारी गोपाळकृष्ण परसराम लोखंडे (५०) व विलास पंडितराव मुंढे (४४) या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
पोलिस सूत्रानुसार, सन २०१३ -१४ ते सन २०१७-१८ या कालावधीत तालुक्यातील चप्राड येथील ग्रामपंचायतमध्ये शासनाच्या १३ व १४ वा वित्त आयोगअंतर्गत विविध विकास कामांसाठी लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला होता. या निधीतून ग्रामपंचायत क्षेत्रातील विविध विकास कामांमध्ये उपयोगी विविध साहित्याची खरेदी करताना तत्कालीन सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी संगनमताने बनावट देयकांचे आधारे अनियमितता करून शासन निधीचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. तर ग्रामपंचायतीच्या सामान्य फंडासह पाणीपुरवठा योजनेच्या कामातदेखील अनियमितता करून लाखो रुपयांच्या निधीचा अपहार केल्याचा आरोप होता.
या गैरव्यवहाराची तक्रार भंडारा जिल्हा परिषद प्रशासनाकडे करून गावकऱ्यांनी ग्रामपंचायत कारभाराची चौकशी व लेखा परीक्षण करून दोषीविरोधात कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या लेखा व वित्त अधिकाऱ्यांनी केलेल्या लेखा परीक्षणात चप्राड ग्रामपंचायत अंतर्गत सन २०१०-११ ते २०१५-१६ मध्ये शासनाच्या १३ वित्त आयोगाअंतर्गत प्राप्त निधीतून नियमबाह्यरित्या विविध बांधकाम साहित्य खरेदीचा आरोप करण्यात आला होता. तत्कालीन ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक अधिकाऱ्यांनी अनियमितता करून १९ लाख ६ हजार रुपयांचा निधी अपहार केला. तर सन २०१५-१६ ते सन २०१७-१८ च्या दरम्यान ग्रामपंचायतीच्या सामान्य फंडातील राशी अंतर्गत तब्बल ३० लाख २१ हजार रुपयांची अनियमितता असल्याचा आरोप करण्यात आला आहे.