Beed Crime : बीडच्या आष्टी तालुक्यातील केरूळ गावातल्या भागवत वस्तीवर मंगळवारी मध्यरात्री दरोडा पडला. दरोडेखांनी 11 जणांवर धारधार शस्त्रांनी हल्ला केला. संतापजनक बाब म्हणजे, यावेळी दीड महिन्यांच्या बाळाला देखील जमिनीवर आपटून मारहाण करण्यात आली. यात भागवत कुटुंबातील 9 व्यक्ती आणि 3 बालक गंभीर जखमी झाले आहेत.
याप्रकरणी पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल केला असून दरोडेखोरांचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील (Beed News) केरूळ गावात भागवत वस्ती आहे. या वस्तीवर भागवत कुटुंबीय राहतात.
मंगळवारी रात्री ते घरात झोपले असताना अचानक अज्ञात 10 ते 12 दरोडेखोर आले. त्यांनी कुटुंबातील सर्व व्यक्तींना मारहाण (Crime News) केली. इतकंच नाही तर घरातील महिला आणि दीड महिन्यांच्या बाळाला ओलीस धरून दागिने, सोने आणि पैसे कुठे ठेवलेय सांगा, असं म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली.
भागवत कुटुंबियांनी याला प्रतिकार केला असता, दरोडेखोरांनी धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेत कुटुंबातील अनेकजण जखमी झाले आहेत. दरम्यान, दरोडेखोर घरातील सोने-चांदीचे दागिने आणि मुद्देमाल घेऊन फरार झाले आहेत.
स्थानिकांकडून या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी भागवत वस्तीवर धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या हल्यामुळे भागवत कुटुंब भयभित झाले आहेत.