Manoj Jarange Patil : सरकारमधील नेत्यांची फूस होती. त्यासाठी पडेल-सडेल लोक आंदोलनात आणून बसवले, नाव न घेता जरांगेंची हाकेंवर टीका
Manoj Jarange Patil : मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगेंनी आता शांतता रॅलीचे आयोजन केले आहे. बीडमधील सभेत जरांगेंनी मंत्री छगन भुजबळ, गिरीश महाजन, धनंजय मुंडे यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांच्यावरही निशाणा साधला.
तर ओबीसी आरक्षण बचावासाठी लढणारे आंदोलक लक्ष्मण हाकेंवरही नाव न घेता टीका केली.
जालन्यातील अंतरवाली सराटीतून मराठ्यांनी आरक्षणासाठी आंदोलन सुरू केले. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणीविरोधात शेजारील वडिगोद्री गावात ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणार्थ लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी उपोषण सुरू केले.
त्या आंदोलनाला अनेक नेत्यांनी पाठिंबा दिला. त्यावर मनोज जरांगे म्हणाले, मराठा आरक्षणाविरोधात ओबीसींचे आंदोलन सुरू केले. त्याला सरकारमधील नेत्यांची फूस होती. त्यासाठी पडेल-सडेल लोक आंदोलनात आणून बसवले, असे नाव न घेता जरांगेंनी हाकेंवर टीका केली.
त्यानंतर मनोज जरांगेंनी आरक्षण देण्यासाठी सरकारच्या वतीने आलेले शिष्टमंडळाने चार शब्दांवर एकमत झाले होते, याची आठवण करून देत मुख्यमंत्री शिंदेंचे ओएसडी मंगेश चिवटे यांच्यावर बरसले. त्यातील तिसरा आणि चौथा शब्दांवर झालेल्या चर्चेची माहिती जरांगेंनी यावेळी दिली.
तिसरा शब्द सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी आणि चौथा शब्द सापडलेल्या नोंदींवर राज्यातील मागेल त्या मराठ्याला आरक्षण द्यावे लागले. यावर आलेले सर्व न्यायाधीश मंत्री, आमदारांनी एकमत केले होते.
या शब्दांवर कुणीही बदलायचे नाही, असे ठरले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांचे ओएसडी म्हणाले, हे पक्के झाले का? आता या चार शब्दांचे लॅमिनेशन करून आणू का? असे त्यांनी विचारले. त्यावर, आणा, असे म्हणालो. आता त्यांच्या बगलेतच ते लॅमिनेशन असेल. त्यातील एका शब्दाचे म्हणजे सगेसोयऱ्यांबाबत लफडे सुरू आहे.
गिरीश महाजनांबाबत आधीच माहिती असल्याने मी मागेल त्याला असे शब्द वापरले आहेत. त्यामुळे त्यांची कोंडी झाली आहे. त्यातूनच ते ही मागणी टिकणार नाही, असे म्हणतात. मी मागेल त्या मराठ्याला आरक्षण म्हणालो की मंत्री धनंजय मुंडे यांचे कानच उभे राहिले. ते उपस्थित होते. गुडघ्यावर बसले होते. उदय सामंत काहीच बोलत नव्हते, याची आठवणही जरांगेंनी सांगितली.
चर्चेनंतर मुंडे म्हणाले, की मागेल त्याला आरक्षण म्हणजे सरसकट झाले की! त्यावर, हो आमची मागणी तीच आहे, असे स्पष्ट केले. त्यानंतर ही मागणी कशी आली, याचाही किस्सा जरांगेंनी सांगितला.
महाजन यांनी, सरसकट म्हणाल्यावर ओबीसी नेत्यांच्या पोटात दुखते. तुम्ही दुसरा शब्द वापरा, असे सांगितले होते. त्यावर सगेसोयरे हा शब्द आला. तसेच नोंद सापडली त्या आधारावर मागेल त्या मराठ्याला आरक्षण द्यायचे, असे ठरले होते. आता हे सगळे मुख्यमंत्र्यांचे ओसडी यांच्या बगलेत लॅमिनेशन करून ठेवलेले आहे, असा टोलाही जरांगेंनी लगावले.