लांब नख असलेली महिला शाळेत आली अन शाळेत आक्रोश, किंकाळ्या; मुलांनी दाबले एकमेकांचे गळे, पालक थरथर कापायला लागले!
शाळेमध्ये अचानक आरडाओरडा आणि गोंधळ सुरू झाला. विद्यार्थ्यांनी एकमेकांचे गळे दाबले, त्यामुळे अनेक विद्यार्थी बेशुद्ध झाले. या घटनेमुळे शाळेत फक्त आक्रोश आणि किंकाळ्या ऐकू येत होत्या.
माहिती मिळताच पालक, गावातली लोक आणि डॉक्टरही शाळेत पोहोचले. बरेलीच्या शाळेमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
मुलांनी एकमेकांचे गळे दाबल्यामुळे अनेक विद्यार्थी बेशुद्ध पडले. शिक्षकांनी यानंतर लगेचच डॉक्टरांना शाळेत बोलावलं. या भयानक घटनेमुळे सरकारी ज्युनियर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. प्राथमिक उपचारांनंतर मुलांना सोडून देण्यात आलं आहे.
शाळेत नेमकं काय झालं, हे विचारल्यानंतर विद्यार्थ्यांनी जे उत्तर दिलं ते ऐकून तिकडे उपस्थित असलेल्या सगळ्यांचे हात-पाय थरथर कापू लागले. मुलांनी सांगितलं की एक लांब नख असलेली महिला शाळेत आली होती, जी आम्हाला घाबरवत होती. शाळेत भूत आल्याची अफवा पसरल्यामुळे एकच गोंधळ उडाला. यानंतर मिड-डे मिलमध्ये मुलांना खायला काय देण्यात आलं? याची चौकशीही पालक आणि डॉक्टरांकडून केली गेली. मिड-डे मिलमध्ये मुलांना बटाटा-भात देण्यात आला होता. तपासणीमध्येही मिड-डे मिल योग्य असल्याचं निष्पन्न झालं.
मुलांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांच्यात कोणत्याही आजाराची लक्षणं नसल्याचं स्पष्ट केलं. थंडी किंवा थकवा आल्यामुळे असं होऊ शकतं. तसंच डॉक्टरांना हिस्टीरियाचाही संशय आहे. अशा प्रकरणांमध्ये पूर्ण समूह एकसारखाच वागतो. शाळेतल्या या घटनेनंतर संपूर्ण परिसरात अदृश्य शक्तीच्या प्रकोपाची अफवा पसरली आहे. यानंतर एसडीएमनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे.