थोड्या वेळात जिच्याशी लग्न होणार आहे, ती मुलगी आपली बहीण आहे हे कळल्यावर त्या नवऱ्याची काय अवस्था होऊ शकते? ही एखाद्या चित्रपटाची कथा नसून खरी घडलेली हकीकत आहे. चीनमध्ये एका लग्नामध्ये नवऱ्या मुलाच्या आईला होणारी सून हीच आपली हरवलेली मुलगी असल्याचा साक्षात्कार झाला.
लग्नात थोडा गोंधळ झाला; पण नंतर काय घडलं ते जाणून घेऊ या.
काही विचित्र व आश्चर्यकारक घटना केवळ चित्रपटांमध्येच घडत नाहीत. वास्तवातही त्या घडताना दिसून येतात. चीनमध्ये 2021 साली अशीच एक घटना घडली. सर्वसामान्यांच्या आयुष्यात अशी घटना घडणं दुर्मीळ असतं. एका लग्नामध्ये नवरीला घेण्यासाठी आलेल्या नवऱ्या मुलाच्या आईला होणारी सून ही आपली हरवलेली मुलगी असल्याचा साक्षात्कार झाला. अनेक नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर अखेर ते लग्न पार पडलं.
नवऱ्या मुलाची आई वरात घेऊन नवरीच्या घरी पोहोचली. नवरी मुलगी बाहेर येऊन उभी होती, तेव्हा नवऱ्याच्या आईनं तिच्या हातावरची एक खूण पाहिली. यामुळे तिच्या मनात संशय निर्माण झाला. त्यानंतर मुलीच्या आई-वडिलांनी ती मुलगी आपल्याला रस्त्याकडेला सापडल्याचं कबूल केलं. त्यामुळे त्यांनी मुलीला दत्तक घेतलं होतं. त्यामुळे नवऱ्याच्या आईची खात्रीच पटली. त्यांनी सांगितलं, की ती मुलगी त्यांची पोटची मुलगी आहे. ती 20 वर्षांपूर्वी त्यांच्यापासून लांब गेली होती. हे समजल्यावर आई व मुलगी यांच्यातलं नातं पुन्हा जोडलं गेलं.
नवरी मुलगी होणाऱ्या सासूची खरी मुलगी असल्याचं लक्षात आल्यावर लग्न कसं होणार असा प्रश्न सर्वांना पडला; मात्र लवकरच त्यातलं सत्यही सर्वांसमोर आलं. नवरा मुलगादेखील त्या दांपत्याचा पोटचा मुलगा नव्हता. त्यांनी त्याला दत्तक घेतलं होतं. या खुलाशानंतर दोन्ही कुटुंबीयांनी त्यांचं लग्न लावण्याचा निर्णय घेतला. यामुळे तो मुलगा मुलीचा नवरा झाला; पण ती तिच्या खऱ्या आईची सून झाली.
चीनमधलं हे लग्न म्हणजे केवळ नवरा-नवरीच्या मीलनाचा सोहळा नव्हता, तर आई आणि मुलीच्या पुनर्मीलनाचाही सोहळा होता. नातेवाईकांनीही त्याचा आनंद साजरा केला. अनेक नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर अखेर ते लग्न पार पडलं; मात्र तोपर्यंत कोण कोणाचा मुलगा व कोणाची मुलगी हे नातेवाईकांनाही कळत नव्हतं. अखेर दोघांनाही दत्तक घेतलेलं असल्याचं समजल्यानंतर हा विवाहसोहळा पार पडला.