बीड – आ. सुरेश धस यांनी प्रशिक्षणार्थी सनदी अधिकाऱ्यांशी संवाद साधत घेतला ग्रामीण वास्तवाचा आढावा

बीड, 21 ऑक्टोबर, । भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी प्रशिक्षणार्थी सनदी अधिकाऱ्यांशी संवाद साधत ग्रामीण वास्तवाचा घेतला आढावा घेतला.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून निवड झालेल्या आणि गृह, वित्त, महसूल व ग्रामविकास यांसारख्या महत्त्वाच्या विभागांत वर्ग-१ अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या सुमारे २६ प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी मागील आठ दिवसांपासून आष्टी तालुक्यातील जामगाव, मांडवा, बेलगाव यांसह विविध गावांना भेटी देऊन ग्रामीण परिस्थितीचा अभ्यास केला.
ग्रामीण भागातील सामाजिक, आर्थिक आणि प्रशासकीय वास्तव जाणून घेण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या या सर्वेक्षणाच्या अनुषंगाने सर्व प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना अद्वैतचंद्र निवासस्थानी आमंत्रित करून त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार केला.
यावेळी त्यांच्याशी मुक्त संवाद साधत ग्रामीण भागातील प्रश्न, स्थानिक परिस्थिती, विकासाच्या संधी आणि प्रशासनासमोरील आव्हाने याविषयी आपुलकीने चर्चा केली. प्रत्यक्ष गावांमध्ये जाऊन नागरिकांचे जीवनमान, त्यांच्या गरजा आणि स्थानिक प्रश्न समजून घेणे हे प्रशासकीय सेवेत अत्यंत महत्त्वाचे आहे. या अनुभवातून प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना ग्रामीण वास्तवाची जवळून ओळख होऊन भविष्यात लोकाभिमुख प्रशासन घडविण्यास मदत होईल, असा विश्वास आहे.
यावेळी जामगावचे सरपंच श्याम धस, कडा गावचे सरपंच युवराज पाटील, प्रवीण वारे, बिभीषण सोनटक्के, हनुमंत पोठरे, बाळासाहेब थोरवे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.



