मांजरी खुर्दमध्ये बिबट्याचा कहर; गोठ्यात घुसून वासराचा फडशा, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

मांजरी खुर्द : परिसरात बिबट्याची दहशत कायम असून, शुक्रवारी मध्यरात्री माणिकनगर परिसरात गोठ्यात बांधलेल्या वासरावर बिबट्याने हल्ला करून त्याचा फडशा पाडल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व इतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. माणिकनगर येथील शेतकरी दत्तात्रय त्रिंबक उंद्रे यांचा घराला लागूनच जनावरांचा गोठा आहे. त्यामध्ये गायी, वासरे व इतर जनावरे बांधण्यात आली होती. गोठ्याभोवतीचे कुंपन ओलांडून बिबट्याने गोठ्यात प्रवेश करून बांधलेल्या वासरावर हल्ला करून फडशा पाडला. दररोजच्या वेळेप्रमाणे शेतकरी उंद्रे शुक्रवारी सकाळी गायीचे दूध काढण्यासाठी गोठ्यात गेले असता त्यांना वासरू मृतावस्थेत आढळून आले.
माजी सरपंच स्वप्निल उंद्रे यांनी वनविभागाचे कर्मचारी ज्ञानेश्वर शिवले यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून घटनेची माहिती दिली. वन कर्मचारी शिवले यांनी तातडीने घटनास्थळी येऊन पंचनामा केला. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, कोलवडी आणि मांजरी परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून, यापूर्वीही पाळीव प्राण्यांवर हल्ल्याच्या घटना घडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी रात्रीच्या वेळी शेतात जाणे धोकादायक ठरत आहे. परिसरात बिबट्याच्या वावराने दहशत निर्माण झाली असून शेतातील कामे करण्यासाठी जायचे तरी कसे, असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी माजी सरपंच स्वप्निल उंद्रे व पंडित उंद्रे यांनी केली आहे.



