
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे काल पुण्यात होते. मात्र तेथे ते फारच आक्रमक भूमिकेत दिसले. पुण्यातील एका कॉलेजमध्ये पोहोचलेल्या अमित ठाकरे यांनी त्या कॉलेजमधील वसतीगृह अधीक्षकांच्या कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोशेजारी असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवायला लावला.
यामुळे मोठी खळबळ माजली, गदारोळ झाला. राजकीय वातावरणही चांगलंच तापलं. भाजपने यावरून अमित ठाकरेंवर निशाणा साधला, त्यांच्यावर टीकाही केली. या प्रकरणी आता अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनसेचा नवा पप्पू शिवसेना भवनवर गप्प का ?
दरम्यान हे प्रकरण आता आणखीनच तापलं असून अमित ठाकरे यांच्यावर सोशल मीडियावरूनही टीकास्त्र सोडण्यात येत आहे. अमित ठाकरे यांना प्रश्न विचारणारे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. त्यातच आता एक नवा फोटो सध्या फिरत आहे. ‘शिवरायांच्या बाजूचा मोदींचा फोटो काढायला लावणारा मनसेचा नवा पप्पू शिवसेना भवनावर गप्प का? ‘ ‘ सेना भवनात महाराजांच्या वर असलेल्या बाळासाहेबांचा फोटो काढायची हिंमत दाखवणार का ?’असा प्रश्न विचारणारा एका फोटो सध्या वाऱ्याचा वेगान व्हायरल झाला असून अमित ठाकरे यांच्यावर प्रश्नांची बरसात केली जात आहे.
भाजप युवा मोर्चाचं आज दुपारी माहीममध्ये आंदोलन
आता या टीकेला मनसे आणि अमित ठाकरे काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान अमित ठाकरेंविरोधात भाजप युवा मोर्चा आज दुपारी माहीममध्ये आंदोलन करणार आहे. भाजप युवा मोर्चाच्या या पार्श्वभूमीवर शिवतीर्थबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलं आहे.
नेमकं काय घडलं ?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे पुणे दौऱ्यावर होते, काल त्यांनी शहरातील विविध महाविद्यालयांना भेटी देत विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.शिवाजीनगर येथील शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या भेटीदरम्यान मात्र अमित ठाकरे यांचा आक्रमक अंदाज पाहायला मिळाला.
विद्यार्थ्यांना कॅन्टीनमध्ये मिळणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या अन्नाचा मुद्दा उपस्थित करत अमित ठाकरे यांनी थेट महाविद्यालयाच्या प्राचार्य कार्यालयात धडक दिली. विद्यार्थ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष का केलं जात आहे, असा सवाल करत त्यांनी प्राचार्यांकडे जाब विचारला. याशिवाय, विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने कॅम्पसमध्ये पुरेसे सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचंही त्यांनी नमूद केलं.
दरम्यान, विद्यार्थी प्रश्नांवर चर्चा सुरू असतानाच एका तरुणाने अमित ठाकरे यांचे कार्यालयातील भिंतीकडे लक्ष वेधलं. या भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आला होता. हे लक्षात येताच अमित ठाकरे यांनी तो हटवण्यास सांगितलं. या घटनेनंतर पुण्यातील राजकीय वातावरण तापलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवण्याच्या मुद्द्यावरून भाजपने अमित ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला . या प्रकरणी अमित ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीही भाजपकडून करण्यात आली.



