Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

रशियन सैन्यात भरती झालेल्या 51 हिंदुस्थानींचा मृत्यू, 139 जणांची सुटका करण्यात यश

रशियन सशस्त्र दलात भरती झालेल्या 227 हिंदुस्थानी नागरिकांपैकी 139 जणांची सुटका करण्यात आली असून 51 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सोमवारी दिली. रशियन सैन्यात अद्याप सेवा बजावत असलेल्या हिंदुस्थानी नागरिकांची लवकरात लवकर सुटका करून त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी हिंदुस्थानकडून मॉस्कोसोबत सातत्याने चर्चा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या किर्गिझस्तान दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत रशियन सैन्यात सेवा बजावत असलेल्या हिंदुस्थानी नागरिकांबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मिस्री यांनी ही माहिती दिली. हिंदुस्थानी नागरिकांची रशियन सशस्त्र दलात भरती करण्यात आल्याचा मुद्दा भारताने रशियासोबत वेगवेगळ्या स्तरांवर आणि विविध प्रसंगी उपस्थित केला असल्याचे त्यांनी सांगितले.

मिस्री म्हणाले की, उपलब्ध माहितीनुसार 227 हिंदुस्थानी नागरिकांची रशियन सैन्यात भरती करण्यात आली होती. त्यापैकी 139 जणांना आतापर्यंत सैन्यातून मुक्त करण्यात आले आहे. मात्र, दुर्दैवाने 51 हिंदुस्थानी नागरिकांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

अद्याप रशियन सैन्यात सेवा बजावत असलेल्या आणि ज्यांची प्रकरणे प्रलंबित आहेत, अशा हिंदुस्थानी नागरिकांची लवकरात लवकर सुटका करून त्यांना हिंदुस्थानात परत आणण्यासाठी हिंदुस्थान रशियासोबत सातत्याने संपर्कात आहे. हा मुद्दा रशियन सरकारसोबत नियमित चर्चेत असल्याचे मिस्री यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मॉस्कोतील हिंदुस्थान दूतावास परिस्थितीवर नियमितपणे लक्ष ठेवून आहे. उर्वरित हिंदुस्थानी नागरिकांची सुटका आणि त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी दूतावास रशियन अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. जे हिंदुस्थानी अद्याप रशियन सैन्यात आहेत, त्यांना शक्य तितक्या लवकर सेवेतून मुक्त करून त्यांच्या कुटुंबीयांकडे परत आणण्याचा प्रयत्न असल्याचे मिस्री यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *