पुणे महापालिका भरतीत कॉपीचा खेळ! ‘मॉडर्न स्टाइल’ने परीक्षा दिली, चष्म्याने केला घात; तपासात धक्कादायक खुलासा!

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदासाठी घेण्यात आलेल्या भरती परीक्षेत हायटेक पद्धतीने कॉपी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील ‘आयकॉन डिजिटल झोन’ परीक्षा केंद्रावर उमेदवारांनी चष्म्यात गुप्त स्पाय कॅमेरा लपवून प्रश्नपत्रिकेचे फोटो बाहेर पाठवले होते.या प्रकरणी गजानन पाचे, शिवशंकर शेळगावे आणि विष्णुकांत वाघमारे या 3 परीक्षार्थींसह त्यांना गैरकृत्यात मदत करणाऱ्या TCS कंपनीच्या योगेश राठोड व विकास गायकवाड या 2 कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
एकूण 6 जणांविरोधात पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,संशयित उमेदवारांनी चष्म्यातील कॅमेऱ्याद्वारे स्क्रीनवरील प्रश्न बाहेर पाठवले. सुरुवातीचे 30 मिनिटे फक्त प्रश्न वाचल्यानंतर ते वॉशरुमला गेले आणि परत आल्यावर अवघ्या 30 मिनिटांत 90 पेक्षा जास्त प्रश्नांची अचूक उत्तरे दिली.
रफ शीटचा वापर न करता या उमेदवारांना 90 पेक्षा जास्त गुण मिळाले आणि त्यांची निवड यादीत वर्णी लागली होती.
महापालिकेच्या 169 जागांसाठी एप्रिल महिन्यात ही ऑनलाइन परीक्षा झाली होती. राज्यभरातील 22000 हून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. या निकालात निवड झालेल्या 545 उमेदवारांना 1 आणि 2 जुलै रोजी कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले होते. तांत्रिक लॉगशीट तपासताना हा गैरप्रकार उघडकीस आला.
या गैरप्रकारानंतर आमदार रोहित पवार यांनी महापालिका प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र तीव्र संताप व्यक्त केला आहे. चौकशी अहवालात गैरप्रकार सिद्ध झालेला असतानाही प्रशासन पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्याची घाई का करत आहे, असा सवाल त्यांनी विचारला. अभ्यासू विद्यार्थ्यांवर अन्याय करणार्या या रॅकेटची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.



