
मधमाश्यांना गुरुत्वाकर्षणाशिवाय पोळे कसे बांधता येते हे तपासण्यासाठी ‘नासा’ या संस्थेने १९८४ साली आगळावेगळा प्रयोग सुरू केला. त्यासाठी ३,३०० मधमाश्यांना अंतराळात पाठवण्यात आले. त्यांनी तेथे पोळे कसे बांधले, या प्रयागोतून काय सिद्ध झाले याचा हा आढावा…
नासाने मधमाश्यांवर कोणता प्रयोग केला?
नासाने ‘डिस्कव्हरी’ या अवकाशयानातून सन १९८४मध्ये मधमाश्यांनी भरलेली एक लहान पेटी अवकाशात पाठवली. गुरुत्वाकर्षणाशिवाय मधमाश्या कशा वागतील हे पाहण्याच्या उद्देशाने हा प्रयोग करण्यात येत होता. मधमाश्यांचा शेतीशी जवळचा संबंध आहे, कारण त्या अन्नासाठी आवश्यक असलेल्या अनेक वनस्पतींचे परागीभवन करतात. मानवाने कधी पृथ्वीपासून दूर दीर्घ काळासाठी पिके घेतली, तर परागण करणारे कीटक त्या प्रणालीचे उपयुक्त सदस्य बनू शकतील. त्यामुळे नासाला भविष्यातील अंतराळ-आधारित शेतीचा एक संभाव्य भाग म्हणून मधमाश्यांचा प्रयोग करणे आकर्षक वाटले. ‘सेंटर फॉर ह्युमन्स अँड नेचर’ने दिलेल्या वृत्तानुसार सन १९८४ मध्ये हा प्रयोग होण्यापूर्वी नासाने १९८२मध्येही असा प्रयोग केला होता.
त्या वेळी सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा कीटकांच्या हालचालींवर काय परिणाम होतो हे तपासण्यासाठी इतर कीटकांसोबत १४ मधमाश्या पाठवण्यात आल्या होत्या. त्यावेळी त्या मधमाश्यांना उडण्यास त्रास झाला. त्या प्रयोगादरम्यान मधमाश्या पृष्ठभागांना चिकटून राहत होत्या. त्या नंतरच्या १९८४मधील मोहिमेत शास्त्रज्ञांनी निरीक्षणासाठी ३,३०० मधमाश्यांना डिस्कव्हरी यानाने पाठवले. या वेळी त्यांना एका खास तयार केलेल्या बंदिस्त जागेत ठेवण्यात आले होते. या रचनेमुळे संशोधकांना मधमाश्यांना अन्न आणि पाणी पुरवता आले, तसेच त्यांना फिरण्यासाठी आणि पोळे बांधण्यासाठी पुरेशी जागाही मिळाली. मधमाश्यांचा एक तुलनात्मक गट पृथ्वीवर ठेवण्यात आला होता, जेणेकरून संशोधकांना अंतराळ आणि जमिनीवरील प्रयोगांमधील फरक अभ्यासता आला.
गुरुत्वाकर्षणाशिवाय मधमाश्यांनी पोळे कसे बांधले?
मधमाश्यांसाठी त्यांचे पोळे हे केवळ एक मधाच्या साठवणुकीची रचना नसते. त्यातील मेणाच्या पोकळ्या मध आणि परागकणांसाठीची जागा असते. तसेच वाढणाऱ्या लहान मधमाश्यांसाठी एक पाळणाघर असते. कामगार मधमाश्या त्यांच्या ग्रंथींमधून मेण तयार करतात. मग ते लहान कण हाताळून, हळूहळू त्यांना षटकोनी कप्प्यांचा आकार देतात. पृथ्वीवर त्यांना अशा प्रकारे पोळे वेगाने तयार करता येते. मात्र, अंतराळातील प्रयोगादरम्यान त्यांना तसे पोळे बनवणे अवघड गेले. आठवडाभर चाललेल्या मोहिमेदरम्यान मधमाश्यांनी २०० चौरस सेंटीमीटरचे पोळे तयार केले. हे प्रमाण सुमारे ३१ चौरस इंचाइतके आहे.
दिशा शोधण्यात अडचणी
शास्त्रज्ञांनी नोंदविलेल्या निरीक्षणानुसार, अंतराळात मधमाश्यांना गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे पोळे बांधताना वरची दिशा कोणती आहे, याचा शोध लावणे अवघड जात होते. पोळे बांधण्याच्या त्यांच्या पहिल्या प्रयत्नामध्ये ते दिसून आले. जमिनीवरील पोळ्यांमध्ये परिचित असलेल्या सुबकपणे रचल्या जाणाऱ्या रचना तयार करण्याऐवजी, त्यांनी वेगवेगळ्या कोनांवर भाग तयार केले. सुरुवातीला, सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात मधमाश्यांना हालचाल करणे कठीण जात होते. सुरुवातीच्या निरीक्षणादरम्यान, काहींनी उडण्याचा प्रयत्न केला, पण त्या भिंतींना धडकल्या. त्यानंतर मधमाश्यांनी परिस्थितीशी जुळवून घेतले. त्या यानात अधिक कुशलतेने वावरू लागल्या.
हळूहळू उडायला शिकल्या आणि त्यांनी बंदिस्त जागेच्या आत पोळे बांधायला सुरुवात केली. मधमाश्यांच्या या समूहाने अखेर ३१ चौरस इंच क्षेत्रफळाचे पोळे बांधले. पृथ्वीवरील पोळ्यांच्या तुलनेत हे प्रमाण कमी वाटू शकते, परंतु या प्रयोगाने हे सिद्ध केले की, मधमाश्या सामान्य गुरुत्वाकर्षणाशिवायही त्यांचे महत्त्वाचे कार्य पार पाडू शकतात. त्यांनी बांधलेले पोळे पूर्णपणे सरळ रेषेत नव्हते. त्यांनी वेगवेगळ्या कोनांनी बनविलेल्या पोळ्यातून त्यांना दिशा ओळखणे कठीण राहिल्याचे निरीक्षण शास्त्रज्ञांनी नोंदविले. पृथ्वीवर जसे केले जाते, त्याचप्रमाणे त्यांनी त्यांच्या समूहातून मृत मधमाश्या काढून टाकल्या. अंतराळातील वातावरण सामान्य नसले तरी मधमाश्यांनी त्यांची वसाहत सुरळीत सुरू ठेवणाऱ्या अनेक दैनंदिन क्रिया केल्याचे निरीक्षण या प्रयोगादरम्यान नोंदविण्यात आले.
नासाने कोणती निरीक्षणे नोंदविली?
नासा लाइफ सायन्सेस पोर्टलने (NLSP) दिलेल्या वृत्तानुसार, या प्रयोगातून आणखी रंजक निष्कर्ष समोर आले. मोहिमेदरम्यान, राणी माशीने ३५ अंडी घातली. मधमाश्या पृथ्वीवर परत आल्यानंतर ती अंडी उबली नाहीत. नासाला त्यामागील कारण समजले नाही. नासाने नोंदविलेल्या निरीक्षणांत मधमाश्या सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात पोळे बांधू शकतात आणि पृथ्वीवर ज्या प्रकारे त्यांचे वर्तन असते तशाच प्रकारे त्या अंतराळात राहू शकतात, हे दिसून आले. परंतु मधमाश्यांची संपूर्ण संख्या अंतराळात यशस्वीपणे प्रक्रिया करू शकते हे त्यातून दिसून आले नाही. या प्रयोगात सहभागी असलेल्या मधमाश्यांची संख्यादेखील महत्त्वाची ठरल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. मधमाश्यांच्या सामान्य समूहात १० हजार मधमाश्या असू शकतात. उन्हाळ्याच्या हंगामात त्यांची संख्या हजारो पटीने वाढू शकते. त्यामुळे अंतराळात पाठवलेल्या मधमाश्यांचे प्रमाण हे त्यांच्या पोळ्यातील एकूण मनुष्यबळाचा केवळ एक छोटासा भाग होता.
मधमाश्यांवरील प्रयोगातून काय साध्य झाले?
गुरुत्वाकर्षणरहित वातावरणात हजारो मधमाश्यांना एकत्र काम करताना पाहिल्याने, त्यांच्या वसाहतीचे काम कशा प्रकारे त्यांनी केले याची उपयुक्त माहिती शास्त्रज्ञानांकडे जमा झाली आहे. ‘डिस्कव्हरी’ यानात मधमाश्यांनी गुरुत्वाकर्षण नसल्याने त्यांनी त्यांच्या हालचालींमध्ये बदल केला, पोळे बांधण्याचे मार्ग शोधले आणि वसाहतीची काळजी घेणे सुरू ठेवले. त्यांच्या या कार्यामुळे मधमाश्यांच्या मर्यादादेखील दिसून आल्या. तसेच पृथ्वीवर सामान्यतः पार पडणारी एक जटिल जैविक प्रक्रिया अंतराळातील परिस्थितीला कशी प्रतिसाद देते, याचा अभ्यास करण्याची नासाच्या संशोधकांना संधी मिळाली.



