Navgan News



Add Space

आंतरराष्ट्रीयताज्या बातम्यानवगण विश्लेषण

गटार साफ करायला गेला अन् सापडलं 98 कोटींचं सोनं, सोन्याच्या वीटा पाहून प्रशासन थक्क…

बेल्जियममधून एक धक्कादायक आणि तितकीच रंजक घटना समोर आली आहे. ‘गटार पाइपलाइन बदलण्याचं काम सुरू असताना मजुरांना जमिनीखाली तब्बल 98 कोटी रुपयांचा सोन्याचा खजिना सापडला. हा खजिना पाहून कामगारांसह स्थानिक प्रशासनालाही मोठा धक्का बसला.

ही घटना बेल्जियमची राजधानी ब्रसेल्सपासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या सिंट-गिलिस-डेंडरमोंडे परिसरातील आहे. एका जुन्या रस्त्यावर ‘गटार पाइपलाइन बदलण्याचं काम सुरू होतं. याच कामात 18 वर्षीय विद्यार्थी कोबे आपल्या सहकाऱ्यांसोबत मजुरी करत होता.

जमिनीखाली चमकणारी वस्तू दिसली

खुदाई सुरू असताना कोबेला जमिनीखाली काहीतरी चमकताना दिसलं. सुरुवातीला त्याला ते साधे एक युरोचे नाणे असावं असं वाटलं. मात्र, जवळ जाऊन पाहिल्यानंतर त्याला तिथे सोन्याच्या विटा आणि सोन्याची नाणी असल्याचं लक्षात आलं. एवढ्या मोठ्या प्रमाणात सोनं पाहून घटनास्थळी उपस्थित सर्वच कामगार आश्चर्यचकित झाले.

मिळालेला हा खजिना एका जुन्या आणि भव्य कोठीच्या खाली असलेल्या तळघराच्या भिंतीत लपवण्यात आला होता. सोन्याची नाणी आणि क्रमांक असलेल्या सोन्याच्या विटा एका मोठ्या पिशवीत ठेवण्यात आल्या होत्या. ही कोठी 1899 मध्ये प्रसिद्ध बीअर उत्पादक थियोफिलस वॅन एशे यांनी बांधली होती. या ठिकाणी 1970 पर्यंत बीअर उत्पादनाचं काम सुरू होतं. आजही या जुन्या इमारतीच्या भिंती अस्तित्वात असून एका संस्थेकडून या वास्तूच्या पुनर्विकासाचं काम सुरू आहे. याच दरम्यान हा ऐतिहासिक खजिना सापडला.

पोलिसांनी घेतला ताबा

जमिनीखाली एवढ्या मोठ्या प्रमाणात सोनं सापडल्याची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी तातडीने परिसर सील केला. सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण खजिना ब्रसेल्समधील सुरक्षित लॉकरमध्ये ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, हे सोनं नेमकं कुठून आलं आणि ते इतकी वर्षे तिथे कोणी लपवून ठेवलं होतं, याचा तपास सुरू आहे. या खजिन्याचा संबंध एखाद्या जुन्या गुन्ह्याशी आहे का, याचाही तपास तपास यंत्रणांकडून केला जात आहे.

18 वर्षीय कोबेला मिळणार मोठं बक्षीस?

हा खजिना सर्वप्रथम पाहणाऱ्या 18 वर्षीय कोबेचंही कौतुक होत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात सोनं सापडल्यानंतर त्याने ते लपवण्याऐवजी प्रशासनाच्या स्वाधीन करणं योग्य असल्याचं सांगितलं. त्यामुळे त्याला याबाबत काय बक्षीस मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *