यमाई देवीचा न्याय? 10 वर्षांपूर्वी देवीचा मुखवटा चोरला; पण नियतीने असा केला हिशोब…

पुणे: पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेल्या कनेरसर येथील प्रसिद्ध यमाई देवी मंदिरात १० वर्षांपूर्वी झालेल्या चोरीचा निकाल लागला आहे. राजगुरूनगर न्यायालयाने या प्रकरणातील दोषीला कडक शिक्षा सुनावली असून, सराईत गुन्हेगाराला आता तुरुंगाची हवा खावी लागणार
विनायक दामू जिते असे या आरोपीचे नाव असून त्याला न्यायाधीश एस. व्ही. उत्कर यांनी ३ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. देवीच्या मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी चोरी करणाऱ्याला अखेर कायद्याने धडा शिकवला आहे.
ही संपूर्ण घटना २०१४ सालची आहे. २७ जुलै २०१४ च्या रात्री चोरट्याने यमाई देवी मंदिराचे कुलूप तोडून आत प्रवेश मिळवला होता. त्या वेळी मंदिरातून सुमारे ४०० ग्रॅम वजनाचा चांदीचा मुखवटा लंपास करण्यात आला होता. या घटनेमुळे संपूर्ण खेड परिसरात आणि भाविकांमध्ये मोठी खळबळ उडाली होती. या चोरीनंतर पोलीस आरोपीचा कसून शोध घेत होते. दरम्यान, आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथे एका दुसऱ्या मंदिरात चोरी झाली आणि त्या तपासाचे धागेदोरे या गुन्ह्यापर्यंत पोहोचले.
पोलिसांनी संशयावरून विनायक जिते याला ताब्यात घेतले असता, त्याने कनेरसरच्या मंदिरात चोरी केल्याचे कबूल केले. त्याच्याकडून चोरीला गेलेला मुखवटा देखील हस्तगत करण्यात आला होता. न्यायालयात सरकारी वकिलांनी मांडलेले पुरावे आणि साक्षीदारांच्या महत्त्वाच्या जबानींमुळे हा गुन्हा सिद्ध झाला. ग्रामीण भागातील मंदिरांच्या सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या निकालानंतर आता अनेक देवस्थान समित्या सतर्क झाल्या असून मंदिरांमध्ये सीसीटीव्ही आणि सुरक्षेच्या उपाययोजनांवर भर दिला जात आहे.






