Navgan News

धार्मिक

पांडव पंचमी २०२५: पांडवांच्या विजयाचे आणि आदर्श गुणांचे स्मरण! वाचा महत्त्व आणि परंपरा!…

कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला ‘पांडव पंचमी’ म्हणून ओळखले जाते. दिवाळीतील महत्त्वाच्या सणांपैकी हा एक दिवस आहे. हा दिवस केवळ पांडवांच्या पराक्रमाचे स्मरण करण्यासाठी नव्हे, तर त्यांच्यातील आदर्श गुण आत्मसात करण्यासाठीही साजरा केला जातो.

महाराष्ट्रासह गुजरात आणि जैन समाजात या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. रामायणात आदर्श राजा, आदर्श पती, आदर्श पत्नी, आदर्श भाऊ अशी सगळीच आदर्श नाती पहायला मिळतात. याउलट महाभारतात नात्यांमधले कपट, आपपरभाव, क्लेष, मत्सर अशा विविध छटा दिसतात. आपले आयुष्य महाभारतासारखेच आहे. मग त्यातून आपल्याला कोणत्या गोष्टी शिकता येतील?

चांगली संगत : कौरव वाईट होते. अधर्मी होते. पांडवांचा मत्सर करणारेदेखील होते. परंतु कितीही झाले, तरी ते पांडवांचे भाऊ होते. ते त्यांच्या वाईटावर टपले नव्हते. त्यांच्याबद्दल फक्त असूया कौरवांच्या मनात होती. त्या असूयेला उग्र स्वरूप प्राप्त झाले, ते शकुनी मामांमुळे. त्या दुष्ट प्रवृत्तीच्या व्यक्तीने कौरवांच्या मनात विष कालवले आणि आपल्याच चुलत भावंडांना नामोहरम करण्यासाठी डावपेच रचले. त्यामुळे कौरवांची बुद्धी भ्रष्ट झाली आणि पांडवांना नामशेष करण्याच्या नादात त्यांचेच अस्तित्त्व मिटून गेले. तेच पांडव मात्र श्रीकृष्णाच्या सान्निध्यात होते. श्रीकृष्णाकडून त्यांना प्रेम, मैत्री, बंधुत्त्व,शासन, धर्म, नितीचे धडे मिळाले. त्याच्या सहवासात राहिलेले पाच पांडव शंभर कौरवांना पुरून उरले. म्हणून आपली संगत चांगली असेल, तर आपण आयुष्यभर चांगलेच काम करत राहू. आयुष्यात शकुनी मामा न येता श्रीकृष्णाला आणण्याचा प्रयत्न करा.

कठीण प्रसंगाचा सामना करा : महाभारत घडण्याआधी पांडवांना तेरा वर्षे वनवास भोगावा लागला. त्या वनवासात त्यांना अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले. अनेक साधू संतांची भेट झाली. अनेक नवीन गोष्टींची शिकवण मिळाली. याच सर्व गोष्टींचा फायदा त्यांना युद्धप्रसंगी झाला. जर आपल्याही आयुष्यात संकट, प्रश्न, समस्या येत असतील, तर त्यातून नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा. त्याच गोष्टी आपल्याला संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतील.

भावनिक होऊ नका: भावुक असणे चांगले आहे, पण गरजेपेक्षा जास्त भावून होणे चांगले नाही. भावनिक व्यक्तीचा कोणीही फायदा घेऊ शकतो. धृतराष्ट्र चांगला राजा, चांगला पती आणि चांगला पिता होता. परंतु पुत्रप्रेमात आधीच अंध असलेला धृतराष्ट्र प्रेमातही अंध झाला. अधर्माची साथ देऊ लागला. धृतराष्ट्राने भावुक न होता वेळीच मुलांची कानउघडणी केली असती, तर महाभारत घडले नसते. कौरव मेले नसते. त्यांचा वंश निर्वंश झाला नसता. म्हणून निर्णयाच्या क्षणी भावनिक होऊ नका, अन्यथा मोठी किंमत मोजावी लागू शकते.

कथा, कांदंबऱ्या नुसत्या वाचून उपयोग नाही, त्यातले चांगले गुण घेऊन वाईट गुण सोडून देता आले तर आपले आयुष्य कुरुक्षेत्रासारखे आणि रोजचा दिवस महाभारतासारखा ठरणार नाही. त्यासाठी वरील तीन गोष्टी लक्षात ठेवा आणि या ग्रंथांचे डोळसपणे वाचन करून त्यावर चिंतन अवश्य करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *